नागपूर येथे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात ‘टेडी बेअर’ जाळून बजरंग दलाचे आंदोलन !

जळगाव आणि भोपाळ (मध्यप्रदेश) येथेही ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात आंदोलन !

(टेडीबेअर : प्राण्यांसारखे मुख असलेले खेळणे)

नागपूर – १४ फेब्रुवारी या दिवशी असलेल्या ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने १३ फेब्रुवारी या दिवशी ‘चेतावणी फेरी’ काढत तेलंगखेडी परिसरात आंदोलन करण्यात आले. या वेळी दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. आंदोलनकर्त्यांनी चक्क ‘टेडी बेअर’ जाळत ‘व्हॅलेंटाईन डे’ला विरोध केला. या वेळी ‘जय श्रीराम’ अशा घोषणाही देण्यात आल्या. रस्त्यावर किंवा उद्यानात प्रेम व्यक्त करण्यास आणि ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यास कार्यकर्त्यांनी विरोध केला.

जळगाव येथेही हिंदुत्वनिष्ठांचा ‘व्हॅलेंटाईन डे’ला विरोध !

‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर जळगाव येथे हिंदु राष्ट्र सेनेनेही प्रेमीयुगुलांना ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा न करण्याची चेतावणी दिली. ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करणे ही पाश्चात्त्य कूप्रथा आहे. ती बंद करण्यासाठी शहरातील महाविद्यालये, सार्वजनिक उद्याने, मेहरूण तलाव, लांडोरखोरी परिसर, कोल्हे हिल्स, हनुमान खोरे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे जाऊन आणि फेरी काढून तरुणांचे प्रबोधन केले. या वेळी ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करतांना प्रेमीयुगुल आढळून आल्यास त्यांचा जागेवरच विवाह लावून देण्यात येईल, अशी चेतावणी हिंदु राष्ट्र सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख मोहन तिवारी यांनी दिली होती.

भोपाळ येथे शिवसेनेचाही ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्याला विरोध !

१३ फेब्रुवारी या दिवशी ‘व्हॅलेंटाईन डे’ प्रेमीयुगुलांना रोखण्यासाठी मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथे शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. काही शिवसैनिकांनी त्यासाठी काठ्यांची पूजाही केली. ‘भारतीय संस्कृती के सम्मान में, शिवसेना मैदान में’, अशा घोषणा देत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हातातील काठ्याही दाखवल्या. ‘पार्क में कुछ करते दिखे बाबू-सोना, तो तोड देंगे शरीर का कोना-कोना’, अशा घोषणा देऊन शिवसैनिकांनी प्रेमीयुगुलांना चेतावणी दिली होती.