स्मरणातील लतादीदी… (कै. लता मंगेशकर (१९२९-२०२२))
मुंबई येथील श्री. सुधांशू नूलकर यांनी लता मंगेशकर यांच्याविषयीची एक अविस्मरणीय आठवण सांगितली आहे.
श्री. सुधांशू नूलकर हे पहिलीत असतांना (वय साडेपाच-सहा वर्षांचे असतांना (वर्ष १९६७)) त्यांना लतादीदींचे गाणे ऐकल्यानंतर त्यांना भेटण्याची इच्छा असूनही भेटता आले नाही. त्यामुळे लतादीदींना त्यांनी पत्र पाठवले. श्री. नूलकर यांच्या या पत्राला लतादीदींनी दिलेले उत्तर आणि त्यांच्या आईला (सौ. मंदा नूलकर यांना) लतादीदींनी पाठवलेले त्यांच्या हस्ताक्षरातील पत्र येथे प्रसिद्ध करत आहोत.
१. लतादीदींचे गाणे ऐकल्यावर त्यांना भेटण्याची इच्छा असूनही भेटता न येणे, त्यामुळे त्यांना पत्र लिहिणे आणि लतादीदींनी त्या पत्राला उत्तर पाठवणे
एके दिवशी मला आणि माझ्या धाकट्या भावाला माझी आई एका कार्यक्रमाला घेऊन गेली. कै. दीनानाथ मंगेशकर यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला स्वतः लतादीदी आवर्जून उपस्थित होत्या. आपल्या छोटेखानी भाषणात त्यांनी सांगितले, ‘‘नुकतेच कोल्हापूरला मी एका गाण्याचे ध्वनीमुद्रण (रेकॉर्डिंग) केले आहे. ते गाणे लवकरच आकाशवाणीवर आणि तबकडीवर (ग्रामोफोन डिस्कवर) ऐकायला मिळेल.’’ लोकाग्रहास्तव त्यांनी त्या गाण्याच्या दोन ओळी (कोणत्याही साथसंगतीविना) म्हणून दाखवल्या. ‘मोगरा फुलला, मोगरा फुलला । फुले वेचिता बहरू कळियासी आला ।।’ ही ती अजरामर रचना होती. मला ती पुष्कळ आवडली आणि मी आईकडे हट्ट धरला, ‘मला या गाणार्या मावशीला भेटायचे आहे.’ आईने मला समजावले, ‘ही मावशी मुंबईला रहाते. त्यामुळे तिला प्रत्यक्ष भेटता येणार नाही.’ शेवटी मी (आणि आईनेसुद्धा) तिला एक पत्र लिहिले. थोड्या दिवसांनी तिने मला (स्वतःच्या अक्षरांत) उत्तरही पाठवले आणि त्यात विचारले, ‘मी तुला भेटायला तुझ्या घरी येणार आहे. तेव्हा मी तुझ्यासाठी काय भेट आणू ?’ मी तिला (लतादीदींना) कळवले, ‘माझ्यासाठी एक रेसर गाडी (खेळण्यातील) आणि गिरीशसाठी (माझ्या धाकट्या भावासाठी) डबलडेकर बस (खेळण्यातील) आण.’
२. पत्राचे उत्तर दिल्यावर काही काळाने लतादीदींनी स्वतः घरी येऊन भेटणे आणि त्यांना पत्रात कळवल्याप्रमाणे त्यांनी खेळणी आणणे
काही काळानंतर मे मासातील एका सकाळी साडेसात-आठ वाजता एक भलीमोठी लांबलचक चारचाकी गाडी आमच्या दारात उभी राहिली. एक भक्कम माणूस (लतादीदींचा वाहनचालक श्री. जयसिंग) त्यातून उतरला आणि ‘सुधांशु नूलकर कुठे रहातात ?’, अशी चौकशी करायला लागला. आमचे घर सापडल्यावर स्वतः लतादीदी (माझी ‘लतामावशी’) गाडीतून उतरून आमच्या घरात आली. मला भेटली. तिने माझी चौकशी केली. आपल्या मांडीवर मला बसवून प्रेमाने माझे मुके घेतले. मी तिला पत्रात कळवल्याप्रमाणे तिने माझ्यासाठी रेसर गाडी आणि माझ्या भावासाठी डबलडेकर बस आणली होती. तसेच माझ्या आईसाठी कोल्हापूरहून श्री महालक्ष्मीदेवीचे चित्रही आणले होते. (आमच्या देवघरात आजही ते चित्र या प्रसंगाची आठवण देत आहे.) पाच-दहा मिनिटे आमच्याशी गप्पा मारल्यावर ती मुंबईला रवाना झाली.
आपल्या छोट्याशा आयुष्यात येणारे असे अविस्मरणीय क्षणच आपल्याला जगण्याचे बळ देतात.’
– श्री. सुधांशु नूलकर, मुंबई (२८.११.२०११) (साभार : ‘मिसळपाव’ संकेतस्थळ)