जिल्हा परिषदेच्या सदस्या माधुरी अत्तरदे यांचा आरोप
जळगाव – कोरोनाच्या काळात जिल्ह्यामध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह आरोग्य यंत्रणेतील अधिकार्यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे, असा आरोप जिल्हा परिषदेच्या सदस्या माधुरी अत्तरदे यांनी १० फेब्रुवारी या दिवशी येथे केला आहे. या घोटाळ्यातील दोषींवर गुन्हे नोंद करावेत, या मागणीसाठी माधुरी अत्तरदे आणि त्यांचे पती चंद्रशेखर अत्तरदे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘आमरण उपोषणास’ बसले आहेत. ‘जोपर्यंत कारवाई होणार नाही, तोपर्यंत ‘आमरण उपोषण’ चालूच राहील’, असे त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणावर व्हेंटिलेटरसह विविध साहित्यांची खरेदी करण्यात आली होती. या वेळी कुठल्याही प्रकारचे लेखापरीक्षण झाले नव्हते. सामाजिक कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी माहिती अधिकारात याविषयीची माहिती मिळवली. त्यामधून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे, अशी माहिती समोर आल्याचा भाजपकडून दावा करण्यात येत आहे. या प्रकरणात जिल्हाधिकार्यांकडे तक्रार करण्यात येऊनही दोषींवर कोणतीही कारवाई झालेली नाही. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांनी यात भ्रष्टाचार केला आहे. या प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी माधुरी अत्तरदे यांनी केली आहे.