आरोपी विकेश नगराळे दोषी; आज न्यायालय शिक्षा सुनावणार ! – विशेष सरकारी अधिवक्ता उज्ज्वल निकम

हिंगणघाट (वर्धा) जळीतकांड प्रकरण

विशेष सरकारी अधिवक्ता उज्ज्वल निकम

वर्धा – हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात आरोपी विकेश नगराळे याला हिंगणघाट न्यायालयाने ९ फेब्रुवारी या दिवशी दोषी ठरवले आहे. या प्रकरणी १० फेब्रुवारी या दिवशी न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार असून विकेश नगराळे याला शिक्षा घोषित होण्याची शक्यता आहे. हिंगणघाटपासून १५ किलोमीटर अंतरावरील दरोडा येथील एका २२ वर्षीय प्राध्यापिकेला एकांगी प्रेमातून जिवंत जाळण्यात आले होते.

पोलिसांनी १९ दिवसांमध्ये ४२६ पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट केले होते. या प्रकरणात एकूण ६४ सुनावणी घेत २९ साक्षीदरांचे प्रत्यक्ष जबाब नोंदवण्यात आले आहेत. घटनेला २ वर्षे झाली असून पीडितेच्या मृत्यूला १० फेब्रुवारी या दिवशी २ वर्षे पूर्ण होत आहेत. याविषयी पीडित प्राध्यापिकेची आई सुषमा पिसुड्डे म्हणाल्या, ‘‘माझ्या मुलीला जिवंत जाळणार्‍या आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आज न्यायालयाने आरोप सिद्ध केले आहेत. न्यायालय जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य राहील; पण माझे दुःख शब्दांत व्यक्त करू शकत नाही.’’

मला कुठल्याही प्रकारचा युक्तिवाद करू दिला नाही, असे आरोपीचे अधिवक्ता  भुपेंद्र सोने यांनी म्हटले आहे आणि उच्च न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे.