हरिद्वार येथील धर्मसंसदेत मांडण्यात आलेले विचार हिंदूंचे विचार नाहीत ! – सरसंघचालक  

सरसंघचालक डॉ. भागवत

नागपूर – धर्मसंसदेच्या कार्यक्रमातून जे काही समोर येत आहे, ते हिंदू शब्द, हिंदू कर्म किंवा हिंदू मन नाही. संघ आणि हिंदुत्व यांवर विश्‍वास ठेवणारे अशा गोष्टींवर विश्‍वास ठेवत नाहीत, असे मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले. गतवर्षी डिसेंबर मासात हरिद्वार येथे पार पडलेल्या धर्मसंसेदत संत, महंत आणि अन्य मान्यवर यांच्याकडून मुसलमानांविषयी कथित आक्षेपार्ह विधाने करण्यात आली होती. त्यानंतर रायपूर येथे पार पडलेल्या धर्मसंसदेत कालीचरण महाराज यांनी मोहनदास गांधी यांच्याविषयी विधान केले होते. याविषयी सरसंघचालक बोलत होते.
सरसंघचालक डॉ. भागवत पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदु समाजाची एकता आणि संघटन करणे, यांविषयी सांगितले होते; परंतु त्यांनी हे श्रीमद्भगवदगीतेचा संदर्भ देऊन सांगितले होते, कुणाचाही नाश किंवा हानी करण्याच्या उद्देशाने नाही. समतोल, विवेक, सर्वांप्रती आत्मियता हेच हिंदुत्वाचे प्रतिनिधित्व आहे.

भारत हिंदु राष्ट्रच आहे !

‘भारत हिंदु राष्ट्र होण्याच्या मार्गावर आहे का?’, असा प्रश्‍न या वेळी सरसंघचालकांना विचारण्यात आल्यावर ते म्हणाले की, कुणी स्वीकारो अथवा नाही; पण भारत हे ‘हिंदु राष्ट्र’च आहे. आपल्या राज्यघटनेचे स्वरूप हिंदुत्व आहे. देशाच्या अखंडतेची भावनाही तशीच आहे.