स्वार्थासाठी बोगस आरोग्य योग्यता प्रमाणपत्र देऊन जनतेच्या जिवाशी खेळणारे आणि त्यांना पाठीशी घालणारे यांच्यावर कठोर कारवाई केली, तरच याला आळा बसेल. निःस्वार्थी, प्रामाणिक पिढी निर्माण झाल्यास भ्रष्टाचाराला वाव रहाणार नाही, यासाठी समाजाकडून साधना करवून घेण्याविना पर्याय नाही ! – संपादक
नवी मुंबई – नवीन वाहनपरवाना काढण्यासाठी लागणारे आरोग्य योग्यता प्रमाणपत्र (हेल्थ फिटनेस सर्टिफिकेट) व्यक्तीची कोणतीही पडताळणी न करता दिले जात आहे. एका वृत्तवाहिनीने हे उघड केले आहे.
विशेष म्हणजे येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या समोरील गाळा क्रमांक १२ येथे एक एम्.बी.बी.एस्. आधुनिक वैद्य १०० रुपयांत हे प्रमाणपत्र देत आहेत. ही गोष्ट वरिष्ठ अधिकार्यांपासून येथील सर्व दलालांना माहीत आहे. असे असतांनाही हे प्रमाणपत्र देणारे आधुनिक वैद्य, तसेच व्यक्ती समोर नसतांनाही ते प्राप्त करून देणारे दलाल यांच्यासह कुणावरही कारवाई केली जात नाही. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एका वृत्तवाहिनीने एका व्यक्तीला संबंधित आधुनिक वैद्यांकडे आरोग्य योग्यता प्रमाणपत्र काढण्यासाठी पाठवून हा प्रकार उघड केला.