मुंबई – परमबीर सिंह यांच्यावर प्रविष्ट करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) दोन पोलीस अधिकारी आणि सिंह यांचा मित्र संजय पुनमिया यांच्याविरोधात ३ फेब्रुवारी या दिवशी आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. जुहू येथील व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्याकडे खंडणीची मागणी केल्याच्या त्यांच्यावर आरोप आहे.
या अन्वेषणात श्यामसुंदर अग्रवाल याने छोटा शकीलद्वारे धमकी दिल्याचा आरोप विकासक संजय पुनमिया याने केला होता; मात्र अन्वेषणात हे दूरभाष श्यामसुंदर यांना अडकवण्यासाठी पुनामियाने हॅकरच्या साहाय्याने स्वत:च्याच कार्यालयातूनच केल्याचे समोर आले आहे. हा सर्व कट परमबीर सिंह याच्या सांगण्यानुसारच रचला गेल्याचा खुलासाही हॅकरने चौकशीत केला आहे. विशेष म्हणजे छोटा शकीलचा आवाज आणि दूरभाषचे ठिकाण (लोकेशन) पाकिस्तानामधील कराची दाखवण्यासाठी पुनामियाने विशेष सॉफ्टवेअर आणि व्ही.पी.एन्.चा वापर केला होता, असे अन्वेषणात उघड झाले आहे.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, आशा कोरके, पुनमिया आणि सुनील जैन यांच्याविरोधात २ सहस्र पानांचे हे आरोपपत्र आहे. यामध्ये एका उपायुक्तासह दोन साहाय्यक पोलीस आयुक्तांच्या नावाचाही समावेश आहे. आरोपींच्या दूरभाष संभाषणाची माहिती, व्हॉट्सॲप चॅट, आवाजाच्या नमुन्यांचा अहवाल, ५० साक्षीदारांच्या साक्षींचाही समावेश आहे. साक्षींमध्ये कलम १६४ अंतर्गत महादंडाधिकार्यांसमोर दिलेल्या साक्षीचाही समावेश आहे.