जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील प्रकार !
जिल्हा रुग्णालयाच्या आवारात सर्रासपणे असा अपप्रकार चालू असतांना रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी झोपले आहेत का ? त्यांना हा प्रकार दिसत नाही का ? कुंपणच शेत खाते’ याप्रमाणे रुग्णालयाचा सुरक्षारक्षकच असे काम करत आहे, हे रुग्णालय प्रशासनाला लज्जास्पद आहे ! या प्रकरणात अधिष्ठाता पदावरील अधिकार्यांनी तात्काळ लक्ष घालून दोषी सुरक्षारक्षकासह या प्रकरणातील इतरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे ! – संपादक
जळगाव – येथील जिल्हा रुग्णालयात लोकांची पडताळणी न करताच ४०० रुपयांमध्ये कोरोनाचा आर्.टी.पी.सी.आर्. ‘निगेटिव्ह’ अहवाल जिल्हा रुग्णालयाच्या आवारात तातडीने मिळत आहे. यासाठी आधारकार्डचे छायाचित्र विशिष्ट क्रमांकावर पाठवून द्यावे लागते. एका दैनिकाच्या प्रतिनिधीने ‘स्टिंग ऑपरेशन’ करून अशाप्रकारे ४ अहवाल मिळवले आहेत.
येथील जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक १ वर असलेले सुरक्षारक्षक राजू पाटील दुर्गे हा उद्योग करत आहेत. त्यांना एका अहवालासाठी ४०० रुपये देण्यात आले होते. त्यानंतर त्यांना असे एकूण ५० अहवाल मिळवायचे आहेत, असे आमीष दाखवण्यात आले. त्यानंतर त्यांनी एकाशी दूरभाषवर चर्चा करून प्रतिदिन १० अहवाल मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
मोठे गिर्हाईक असल्यामुळे ४०० रुपयांचा दर अल्प करून ३०० रुपये करण्यात आला. त्या दरानुसार २ फेब्रुवारी या दिवशी ३ अहवालांसाठी ९०० रुपये आणि तिघांच्या आधार कार्डांची झेरॉक्स देऊन अवघ्या २ घंट्यांत त्यांच्याकडून ‘निगेटिव्ह’ अहवाल मिळाले.
कितीही तातडीने अहवाल पाहिजे असेल, तरीही प्रक्रिया पूर्ण व्हायला अडीच घंटे लागतात आणि संबंधितांपर्यंत अहवाल जायला किमान साडेचार घंटे लागतात, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील प्रमुख डॉ. किशोर इंगोले यांनी दिली.