रासायनिक किंवा सेंद्रिय शेतीची नव्हे, तर नैसर्गिक शेतीची कास धरा ! (भाग २)

१६.१२.२०२१ या दिवशी आणंद, गुजरात येथे नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय परिषद संपन्न झाली. या परिषदेत गुजरातचे मा. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नैसर्गिक शेतीवरील त्यांचे अनुभवकथन केले. गेल्या रविवारी लेखाच्या पहिल्या भागात आचार्य देवव्रत रासायनिक आणि सेंद्रिय या शेतीपद्धतींकडून नैसर्गिक शेतीकडे कसे वळले, तसेच रासायनिक शेतीमुळे त्यांनी भाडेतत्त्वावर दिलेली १०० एकर भूमी कशी नापीक झाली’, हे पाहिले. यापुढील भाग या लेखात पाहू !

रासायनिक किंवा सेंद्रिय शेतीची नव्हे, तर नैसर्गिक शेतीची कास धरा ! (भाग १)

गुजरातचे मा. राज्यपाल आचार्य देवव्रत

१०. आचार्य देवव्रत यांनी कृषी शास्त्रज्ञांचा खर्चिक आणि वेळखाऊ पर्याय नाकारून नैसर्गिक पद्धतीने भूमी पुन्हा सुपीक करण्याचे ठरवणे

मी (आचार्य देवव्रत यांनी) डॉ. हरी ओम यांना विचारले , ‘‘आता मी काय करू ?’’ त्यावर त्यांनी पुढील उपाय सुचवला. ‘अमुक मात्रेत यूरिया, डीएपी, फॉस्फरस, झिंक, पोटॅश ही रासायनिक द्रव्ये, तसेच हिरवळीचे खत मातीत घाला. असे नेमाने करा. मग पुढील २० ते ३० वर्षांत तुमची भूमी हळूहळू सुपीक होत जाईल.’ एवढा दीर्घ कालावधीचा प्रकल्प ! माझी १०० एकर भूमी नापीक झाली होती. मी म्हणालो, ‘‘डॉक्टर, तुम्ही जी सूची बनवली आहे, तेच सर्व घालून तर भूमी नापीक झाली आहे. तुम्ही मला तेच पुन्हा करण्यास सांगत आहात !’’ त्यावर त्यांनी विचारले, ‘‘तुम्ही दुसरे काय करणार ?’’ मी म्हणालो, ‘‘उर्वरित भूमीत मी जी ‘नैसर्गिक शेती’ करतो, तीच करीन.’’ त्यांना या नैसर्गिक शेतीविषयी तोपर्यंत माहिती नव्हती. ते म्हणाले, ‘‘शेण आणि गोमूत्र यांनी काय होणार ?’’ मी म्हणालो, ‘‘मी करून पहातो. काहीच नाही झाले, तर पुन्हा तुमच्याकडे येईन.’’

११. नापीक झालेल्या भूमीतही जिवामृताच्या वापरामुळे पहिल्या वर्षापासूनच पुष्कळ उत्पन्न येणे

१५.४.२०१७ या दिवशी शेतकऱ्यांनी माझी १०० एकर भूमी सोडली होती. त्यात काहीच सुपीकता उरली नव्हती. १५.६.२०१७ या दिवशी मी त्यात एकरी ५ क्विंटल घनजीवामृत टाकून भात लावले. प्रत्येक वेळी पाण्यासह जीवामृत दिले आणि त्याची फवारणीही केली. २ मासांत भातशेती वाढू लागली आणि काढणी झाली तेव्हा माझ्या भाताचे एकरी २६ ते २८ क्विंटल उत्पन्न आले. हे मी डॉ. हरि ओम यांना दाखवले. ते चकितच झाले आणि म्हणाले, ‘‘हे कसे शक्य आहे ? सेंद्रिय कर्ब अत्यल्प असलेली भूमी, म्हणजे नापीक भूमी असतांना तिच्यात एवढे उत्पन्न ?’’ ते निघून गेले. मी पुढच्या वर्षीही त्याच भूमीत पुन्हा पीक घेतले. या वेळीही जीवामृत आणि घनजीवामृत यांचा वापर चालू ठेवला. या वेळी याच शेतात सरासरी ३२ क्विंटल भाताचे उत्पन्न आले.

१२. जिवामृताच्या वापरामुळे भूमीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण पुष्कळ वाढलेले पाहून कृषी वैज्ञानिकही आश्‍चर्यचकित होणे

जेव्हा ३२ क्विंटल भाताचे उत्पन्न आले, तेव्हा डॉ. हरी ओम यांचा विश्वासच बसेना ! ते म्हणाले, ‘‘हा तर चमत्कार आहे ! हे अनाकलनीय आहे. मी आतापर्यंत कृषीशास्त्राचा जो अभ्यास केला आहे, त्यानुसार असे होऊच शकत नाही. आता मी माझ्या शास्त्रज्ञांना बोलावून तुमच्या भूमीची पुन्हा तपासणी करून पहातो.’’ त्यांनी पुन्हा त्या भूमीचे शेकडो नमुने घेतले आणि विद्यापिठाकडे पाठवले. अहवाल आला. एकाच वर्षानंतर माझ्या भूमीतील सेंद्रिय कर्बाचे (कार्बनचे) प्रमाण ०.३ वरून ०.८ पर्यंत वाढले होते. जेव्हा तो अहवाल समोर आला, तेव्हा ते आधीपेक्षा जास्तच चकित झाले. ते म्हणाले, ‘‘रासायनिक शेतीत सेंद्रिय कर्ब एका वर्षात एवढा वाढूच शकत नाही ! जगातील कोणताही शास्त्रज्ञ ‘एका वर्षात सेंद्रिय कर्बाचे (कार्बनचे) प्रमाण ०.३ वरून ०.८ पर्यंत वाढले आहे’, हे मान्य करणार नाही. हे खरोखर आश्‍चर्य आहे !’’

१३. मित्र किटकांचा नाश करणारी रासायनिक शेती

रसायनशास्त्राचे शास्त्रज्ञ हे सत्य मान्य करणारच नाहीत. सेंद्रिय कर्ब वाढवण्याचे काम शेतातील जिवाणू, गांडूळे आणि मित्र कीटक करत असतात. रासायनिक शेतीमुळे हे जीवाणू मारले जातात. मग सेंद्रिय कर्ब कसा वाढणार ?

१४. एका ग्रॅममध्ये ३०० कोटींहून अधिक शेतीसाठी उपयुक्त सूक्ष्म जीवाणू असलेले देशी गायींचे शेण हे शेतकर्‍यासाठी वरदान !

डॉ. हरी ओम यांनी डॉ. बलजीत सारंग यांना अभ्यासामध्ये सोबत घेतले. डॉ. बलजीत सारंग हे सध्या हिस्सार कृषी विद्यापीठ, हरियाणा येथील सूक्ष्मजीवशास्त्राचे वरिष्ठ प्राध्यापक आहेत. त्यांनी अनेक वर्षे अमेरिका, इंग्लंड आणि जर्मनी येथील सूक्ष्मजीवशास्त्राच्या शास्त्रज्ञांसह काम केले आहे. ते त्यांच्या सहकाऱ्यांसह माझ्या गुरुकुलात आले आणि त्यांनी जिवामृतावर संशोधन केले. त्यांनी देशी गाय, म्हैस, तसेच ‘जर्सी’ आणि ‘होल्स्टीन फ्रीजियन’ या विदेशी गायींच्या शेणांचे नमुने घेतले. सर्वांवर अनेक मास वेगवेगळे संशोधन केले. त्यात त्यांना आढळून आले की, देशी गायीच्या १ ग्रॅम शेणामध्ये शेतीसाठी उपयुक्त असे ३०० कोटींहून अधिक सूक्ष्म जीवाणू असतात. साहिवाल, थारपारकर, राठी, गीर, हरियाणवी, लाल सिंधी, कांकरेज, ओंगल इत्यादी सर्वच भारतीय वंशाच्या गायींच्या शेणाची गुणवत्ता जवळजवळ सारखीच असते; परंतु विदेशी वंशाच्या गायी आणि म्हैस यांच्या शेणामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतीसाठी उपयुक्त जीवाणू असत नाहीत. ‘देशी गायींचे मूत्र हे खनिजांचे भांडार आहे’, असेही त्यांना संशोधनात आढळून आले. पाळेकर गुरुजींनी असे संशोधन अनेक वेळा केले आहे. त्यामुळे एक पूर्ण सत्य जगासमोर आले आहे.

१५. जीवामृत बनवण्याची पद्धत आणि त्यामागील शास्त्र

एक एकर शेतीसाठी लागणारे जीवामृत बनवण्यासाठी २०० लिटरचा ड्रम घ्यावा. ड्रम सावलीत ठेवून त्यात सुमारे १८० लिटर पाणी भरावे. त्यात दीड ते २ किलो गूळ, कोणत्याही डाळीचे दीड ते २ किलो पीठ, १ मूठ माती, देशी गायीचे १० किलो शेण, तसेच देशी गायीचे १० लिटर मूत्र हे सर्व मिसळून त्या पाण्यात सोडावे. विचार करा, १ ग्रॅम शेणात ३०० कोटी जीवाणू असतात, तर १० किलो शेणात किती जीवाणू असतील ! या जिवाणूंना डाळीच्या पिठाच्या रूपात प्रथिने मिळतात. यामुळे ते बलवान होतात. गुळामुळे त्यांना ऊर्जा मिळते आणि त्यांची संख्या वाढत जाते. मातीत असलेल्या जीवाणूंशी संपर्क आल्यावर, तर ते इतके वाढतात की, दर २० मिनिटांनी त्यांची संख्या दुप्पट होते. ७२ घंट्यात ते असंख्य प्रमाणात वाढतात आणि १ एकर भूमीसाठीचे खत तयार होते.

१६. जीवामृत हे झाडांसाठी अन्न बनवण्याचे काम करणार्‍या जिवाणूंचे विरजण

जगात असे ४ – ५ दिवसांत तयार होणारे दुसरे खत नाही ! देशी गायीचे एका दिवसाचे शेण आणि मूत्र यांपासून १ एकर शेतीसाठीचे जीवामृत तयार होते. जेव्हा ते शेतातील जीवाणूंशी संयोग पावते, तेव्हा ते विरजणाचे काम करते. त्यापासून असंख्य जीवाणू तयार होतात. हवेत ७८ टक्के नत्र (नायट्रोजन) असते. हे जीवाणू हवेतील नत्र ( नायट्रोजन) खेचून घेऊन झाडाला अन्न म्हणून उपलब्ध करून देतात.

(क्रमशः)

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !लागवडीसंबंधी प्रायोगिक लिखाण पाठवा !

‘लागवड हा एक प्रायोगिक विषय आहे. यामध्ये लहान लहान अनुभवांनाही पुष्कळ महत्त्व असते. जे साधक आतापर्यंत लागवड करत आले आहेत, त्यांनी त्यांना लागवड करतांना आलेले अनुभव, झालेल्या चुका, त्या चुकांतून शिकायला मिळालेली सूत्रे, लागवडीसंबंधी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग यांविषयीचे लिखाण स्वतःच्या छायाचित्रासहित पाठवावे. हे लिखाण दैनिकातून प्रसिद्ध करता येईल. यातून इतरांनाही शिकता येईल.

लिखाण पाठवण्यासाठी टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

संगणकीय पत्ता : [email protected]