(म्हणे) ‘वाईन आणि दारू यांत जमीन-अस्मानाचा फरक !’ – अजित पवार, उपमुख्यमंत्री

हत्या, मारामार्‍या, आत्महत्या, कौटुंबिक हिंसा इत्यादी अनेक गोष्टींमागील मुख्य कारण असलेल्या मद्याचे हे एकप्रकारे समर्थन करणे नव्हे का ? केवळ महसुलासाठी अशा प्रकारची विधाने करून तरुण पिढीला आणखी व्यसनाधीन आणि विकृत करण्याचाच हा प्रकार म्हणावा लागेल. – संपादक

पुणे – वाईन आणि दारू यांत जमीन-अस्मानाचा फरक आहे. राज्य सरकारने दुकानांमध्ये दारू नव्हे, तर वाईनविक्रीला अनुमती दिली आहे; पण काही लोक विनाकारण राज्य सरकारला अपकीर्त करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. ते ३० जानेवारी या दिवशी पुण्यातील जिल्हा कोरोना आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

पवार पुढे म्हणाले की, आपल्या राज्यातील अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची फळे पिकवतात. द्राक्ष आणि काजू यांपासून वाईन सिद्ध होते. आपल्याकडे वाईन पिण्याचे प्रमाण अतिशय अल्प आहे. राज्यात जेवढी वाईन सिद्ध होते, तेवढी प्रत्यक्षात खपत नाही. काही इतर राज्यांत आणि काही परदेशात निर्यात होते. काही देश पाण्याऐवजी वाईनच पितात; पण काहींनी जाणीवपूर्वक ‘मद्यराष्ट्र’ वगैरे संबोधून या गोष्टीला महत्त्व दिले आहे.