नवज्योतसिंह सिद्धू यांना मंत्री बनवण्यासाठी पाकचे पंतप्रधान इम्रान खान आणि निकटवर्तीय यांनी शिफारस केली होती ! – कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा गौप्यस्फोट

  • अमरिंदर सिंह यांच्या या दाव्याची चौकशी करून तो खरा असेल, तर नवज्योतसिंह सिद्धू यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ! – संपादक
  • कॅप्टन अमरिंदर सिंह हे मुख्यमंत्री असतांना त्यांनी या प्रकरणी कोणती कारवाई का केली नाही ? त्याच वेळी ही गोष्ट उघड का केली नाही ? – संपादक
(डावीकडून) नवज्योतसिंह सिद्धू, पाकचे पंतप्रधान इम्रान खान आणि कॅप्टन अमरिंदर सिंह

नवी देहली – नवज्योतसिंह सिद्धू यांना पंजाबच्या मंत्रीमंडळात मंत्री व्हायचे होते. त्यासाठी त्यांनी दबाव निर्माण केला होता. थेट पाकिस्तानातून त्यांच्यासाठी शिफारस करण्यात आली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या निकटवर्तींय यांचे सिद्धू यांच्यासाठी मला दूरभाष आले, तसेच त्यांनी तसे संदेशही पाठवले. याचे सर्व पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत. ‘नवज्योत सिद्धू यांना मंत्रीमंडळात एकदा स्थान द्या. जर त्यांनी मंत्रीपदावर असतांना काही गडबड केली, तर मग तुम्ही त्यांना मंत्रीमंडळात ठेवू नका’, अशा प्रकारचा संदेश मला पाकिस्तानातून आला होता, असा गौप्यस्फोट पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केला आहे. सिद्धू सध्या पंजाबचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आहेत.

अमरिंदर सिंह पुढे म्हणाले की,  पाकिस्तानातून येत असलेले दूरभाष आणि संदेश यांविषयीची माहिती काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि सरचिटणीस प्रियांका वाड्रा यांना दिली होती. माझ्याकडचे संदेश मी त्यांना फॉरवर्डही केले होते. त्यावर सोनिया गांधी यांच्याकडून कोणतेही उत्तर आले नाही; मात्र प्रियांका यांनी उत्तर देत ‘असे संदेश करायला लावणारी व्यक्ती मूर्ख आहे’, असे त्यांनी नमूद केले होते, असा दावाही अमरिंदर सिंह यांनी केला. (यावरून काँग्रेसवाले पाकप्रेमींना पाठीशी घालते, असे समजायचे का ? – संपादक)