पुणे – देशाच्या उत्तरी भागात जम्मू-काश्मीर येथे तैनात असलेल्या ‘मराठा रेजिमेंट’ने मच्छलच्या खोर्यात नियंत्रण रेषेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती उभारली आहे. ही प्रतिकृती १४ सहस्र ८०० फूट उंचावर उभारण्यात आली असून जगात प्रथमच महाराजांची प्रतिकृती इतक्या उंचावर बसवण्यात आली आहे. मच्छल या गावात सैन्यदलाच्या वतीने महाराजांच्या २ प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. या दोन्ही प्रतिकृती पुण्यातील २५ वर्षीय तरुण मूर्तीकार अजिंक्य लोहगावकर यांनी साकारल्या आहेत. शत्रूशी लढणार्या या सैनिकांना महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्यांची आठवण प्रतिदिन व्हावी, या अनुषंगाने ही प्रतिकृती उभारण्याची कल्पना मच्छल बटालियनचे कमांडिंग अधिकारी कर्नल प्रणय पवार यांना सुचली.
याविषयी कर्नल पवार म्हणाले, ‘‘मराठा समाजाला एकत्र करत स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी शत्रूला स्वत:च्या युद्धनीती आणि धाडसी कर्तृत्वाने पळवून लावले. त्यांच्या मावळ्यांच्या फौजेप्रमाणे आज देशाचे सैन्यही सीमेवर शत्रूशी लढत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणेचे केंद्र आहेत. गेल्या १४ वर्षांपासून ‘मराठा रेजिमेंट’ काश्मीर खोर्यात सीमेवर तैनात आहे. सैनिक उठल्यावर त्यांना महाराज यांचे दर्शन घडावे अशाच ठिकाणी या दोन्ही प्रतिकृती उभारल्या आहेत.’’ |