१. ‘सनातन संस्थेवर विविध प्रकारे होत असलेल्या करणींच्या आक्रमणापासून रक्षण होण्यासाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘नंदी हिल्स’ येथे जाऊन प्रार्थना करावी’, असे महर्षींनी सांगणे
‘महर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून (सप्तर्षि जीवनाडीवाचन क्रमांक १६६ मध्ये) सांगितले, ‘‘गुरुदेवांची योगरास वृषभ आहे. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची भाग्यरास वृषभ आहे, तर कार्तिकपुत्री श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची जन्मरास वृषभ आहे. सध्या सनातनवर विविध प्रकारे होत असलेल्या करणींच्या आक्रमणापासून रक्षण होण्यासाठी कार्तिकपुत्रीने बेंगळुरूजवळ असलेल्या वृषभस्थानी जाऊन तेथे दर्शन घेऊन प्रार्थना करावी.’’ त्याप्रमाणे आम्ही जानेवारी मासात ‘नंदी हिल्स’वर शिवाच्या दर्शनासाठी गेलो.
२. प्राचीन आणि अत्यंत सुबक असे शिवमंदिर !
बेंगळुरू येथील ‘नंदी हिल्स’ येथे नंदीचे तपस्थान आहे. येथे नंदीच्या रूपात साक्षात् शिवच योगमुद्रेत बसला आहे. तेथे जवळच पार्वतीचेही स्थान आहे. तिला ‘मुक्तांबा’ असे म्हणतात. ‘येथे शिव ध्यानस्थ आहे; म्हणून पार्वती शिवापासून दूर आहे’, असे म्हटले जाते. येथील पुजार्यांनी सांगितले, ‘‘हे स्थान जरी प्राचीन असले, तरी या मंदिराचे गर्भगृह ९०० वर्षांपूर्वी चोलराजाने बांधले आहे आणि त्याभोवतीचा मंदिराचा परिसर हा विजयनगर साम्राज्याचे राजे कृष्णदेवराय यांनी ६०० वर्षांपूर्वी बांधला आहे.’’ हे मंदिर अत्यंत सुबक आहे.
३. दर्शनाला जाण्यापूर्वी देवाने श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना दिलेला विचार !
३ अ. सनातन संस्थेवर आलेले संकट दूर होण्यासाठी शिवमंदिरात २१ नारळ वाढवण्याचा विचार श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या मनात येणे : मंदिरात जाण्यापूर्वी देवाने मला विचार दिला, ‘सनातन संस्थेवर आलेले संकट दूर होण्यासाठी तू तेथे २१ नारळ वाढव (फोड). तुझ्यासमवेत जे साधक आहेत, त्यांनी प्रत्येकी ५ नारळ वाढवावेत (फोडावेत) आणि तू एक नारळ फोड.’ त्या वेळी माझ्यासमवेत ४ साधक होते. त्यामुळे ‘देवाचे गणित किती अचूक असते’, ते माझ्या लक्षात आले. मी याविषयी महर्षींना विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘देवाने तुम्हाला नारळ फोडायला सांगितले आहेत, तर तुम्ही अवश्य हा उपाय करा.’’
३ आ. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पहिला नारळ फोडणे, तो बरोबर मध्यभागी एका सरळ रेषेत दोन तुकडे होऊन फुटल्यावर ‘शिवाने नारळ स्वीकारला’, असे वाटणे : मंदिराच्या परिसरात देवाला स्मरून मी पहिला नारळ फोडला आणि काय आश्चर्य ! तो नारळ वरून आपटूनही अगदी बरोबर मध्यभागी दोन भागांत सुंदररित्या विभागून फुटला. त्या नारळाचे एका सरळ रेषेत दोन तुकडे होऊन ते सुंदर रितीने भूमीवर ठेवल्याप्रमाणे पडले. जणू काही शिवाने हा नारळ स्वीकारला ! माझ्या समवेत असलेल्या चार साधकांनीही नारळ फोडले.
त्यानंतर सनातनवर आलेल्या एका संकटाविषयी मला साधकांकडून कळल्यावर ‘शिवाच्या या स्थानी मी एवढे नारळ का फोडले ?’, याचा मला उलगडा झाला.
४. महर्षींनी दिलेले स्फटिकाचे शिवलिंग गर्भगृहात ठेवायला देणे आणि काही वेळ तिथे ठेवून पुजार्याने ते आशीर्वादस्वरूप परत देणे, तेव्हा ‘देव समवेत असल्याची जाणीव होऊन तो या संकटातून बाहेर काढेल’, असे वाटणे
मंदिरात दर्शन घेतांना मी महर्षींनी मला दिलेले स्फटिकाचे शिवलिंग तेथील पुजार्यांना दिले आणि सांगितले, ‘‘हे शिवलिंग गर्भगृहात ठेवा, म्हणजे आम्हाला त्यातून शिवाचे चैतन्य आणि आशीर्वाद मिळेल.’’ खरे म्हणजे पुजारी लगेच असे काही करत नाहीत; परंतु त्यांनी ते शिवलिंग गर्भगृहात ठेवून काही वेळाने आशीर्वाद स्वरूपात आम्हाला ते परत दिले. तेव्हा मला वाटले, ‘देव आपल्या समवेत आहे आणि तोच सनातन संस्थेवर आलेल्या संकटातून निभावूनही नेत आहे, आम्ही तृप्त मनाने प्रार्थना करून त्या स्थानाहून परत घरी बेंगळुरूला निघालो.
५. परतीचा प्रवास
५ अ. प्रवासात सूर्यास्ताच्या वेळी आकाशात ‘ॐ’चे दर्शन झाल्यावर ‘खर्या अर्थाने शिवदर्शन पूर्ण झाले’, असे वाटणे : बेंगळुरूला जातांना माझे लक्ष सहजच आकाशाकडे गेले. तेव्हा सूर्य अस्ताला चालला होता. त्या ठिकाणी आम्हाला सुंदर प्रकाशकिरणांच्या रूपात ‘ॐ’चे दर्शन झाले. तेव्हा ‘ॐ’च्या या दर्शनाने खर्या अर्थाने आमचे शिवदर्शन पूर्ण झाले’, असेच जणू शिव आम्हाला सांगत आहे’, असे मला वाटले.
५ आ. चारचाकी वाहनाच्या समोरील काचेवर एका वाईट शक्तीचा तोंडवळा दिसणे : त्याच वेळी आम्हाला आमच्या चारचाकी वाहनाच्या समोरील काचेवर एका वाईट शक्तीचा तोंडवळा दिसला. तो तोंडवळा आमच्याकडे रागाने पहात होता. यावरून आमच्या लक्षात आले, ‘आमचे प्रत्येक देवदर्शन आणि त्यातून आपल्या कार्याला मिळणारे चैतन्य’ याला वाईट शक्तींचा विरोध आहे; कारण हे एक धर्मयुद्धच आहे.’
– (श्रीचित्शक्ति) सौ. अंजली गाडगीळ, होस्पेट, कर्नाटक. (२७.१.२०२१, दुपारी ४.५५)
|