राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जीतेंद्र आव्हाड यांनी सत्तेचा वापर करून पोलिसांवर दबाव आणत कालीचरण महाराजांवर गुन्हा नोंद केला ! – अधिवक्ता पप्पू मोरवाळे

ठाणे, २३ जानेवारी (वार्ता.) – महात्मा गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याच्या आरोपाखाली कालीचरण महाराज यांच्यावर नोंद असलेल्या गुन्ह्यात नौपाडा पोलिसांनी २१ जानेवारीला कालीचरण महाराज यांना ठाणे न्यायालयात उपस्थित केले. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कालीचरण महाराज यांचे अधिवक्ता पप्पू मोरवाळे या प्रकरणी म्हणाले, ‘‘पोलिसांनी २ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. त्यावर आम्ही युक्तीवाद केला. या ठिकाणी कोणतीही घटना घडली नव्हती, तरीही राष्ट्रवादीचे मंत्री जीतेंद्र आव्हाड यांनी सत्तेचा वापर करून पोलिसांवर दबाव आणून कालीचरण महाराज यांच्यावर गुन्हा नोंद केला.’’

कालीचरण महाराजांच्या समर्थनार्थ बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या बाहेरील रस्त्यावर जोरदार घोषणा दिल्या. कालीचरण महाराज यांनी रायपूर येथील धर्मसंसदेमध्ये महात्मा गांधी यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्याचा आरोप करून जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या तक्रारीवरून त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला होता. पुण्यात ते जामिनावर सुटले, रायपूरमध्ये त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली ही सूत्रे विचारात घेऊन न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी फेटाळली. त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर ठाणे पोलिसांनी पुन्हा कालीचरण महाराज यांना कडक पोलीस बंदोबस्तामध्ये रायपूर कारागृहात नेले.