महिला आयोगाची रिक्त पदे भरण्यासाठी न्यायालयाची राजस्थान सरकारला १४ दिवसांची मुदत !
मुंबई, २३ जानेवारी (वार्ता.) – मागील ३ वर्षे रिक्त असलेली राजस्थान महिला आयोगाची पदे नोव्हेंबर २०२१ पर्यंत भरण्याचा आदेश राजस्थान उच्च न्यायालयाने देऊन १ मास झाला तरी कारवाई न करणार्या सरकारच्या विरोधात ‘लष्कर-ए-हिंद’चे राष्ट्रीय अध्यक्ष ईश्वरप्रसाद खंडेलवाल यांनी अवमान याचिका प्रविष्ट केली आहे. या याचिकेवर १८ जानेवारी या दिवशी सुनावणी झाली. या वेळी महिला आयोगाची रिक्त पदे भरण्यासाठी न्यायालयाने सरकारला १४ दिवसांचा कालावधी दिला आहे.
श्री. ईश्वरप्रसाद खंडेलवाल यांनी राजस्थानचे मुख्य सचिव निरंजन कुमार आर्य आणि महिला अन् बालविकास मंत्रालयाच्या प्रधान सचिव श्रेया गुहा यांच्या विरोधात न्यायालयाच्या अवमाना विरुद्ध याचिका केली आहे. १९ ऑक्टोबर २०१८ पासून राजस्थान राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद, तसेच २० जानेवारी २०१९ पासून आयोगातील ३ सदस्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे महिला आयोगाकडे मागील ३ वर्षांपासून सुनावणीसाठी आलेली शेकडो प्रकरणे प्रलंबित आहेत. या विरोधात श्री. ईश्वरप्रसाद खंडेलवाल यांनी राजस्थान न्यायालयात याचिका केली होती. यावर न्यायालयाने २८ सप्टेंबर २०२१ या दिवशी निकाल देतांना नोव्हेंबर २०२१ पर्यंत रिक्त पदे भरण्याचा आदेश दिला होता; मात्र हा कालावधी उलटून १ मास झाला, तरी पदे भरण्यात आली नाहीत. त्यामुळे श्री. ईश्वरप्रसाद खंडेलवाल यांनी ही अवमान याचिका केली.