काँग्रेसच्या उमेदवारांनी निवडून आल्यास पक्षांतर न करण्याची पणजी येथील श्री महालक्ष्मीदेवीसमोर घेतली शपथ

स्वार्थासाठी पक्षांतर करणारे पक्षद्रोही म्हणजेच राष्ट्रद्रोही असतात, हे खरे; पण ‘गोव्यात सुराज्य आणू’, अशी शपथ घेतली असती, तर ते जनतेला अधिक आवडले असते !

गोवा काँग्रेस : पक्षाशी एकनिष्ठ राहणार; काँग्रेस उमेदवारांची महालक्ष्मीसमोर शपथ

पणजी, २२ जानेवारी (वार्ता.) – काँग्रेसच्या उमेदवारांनी निवडून आल्यास पक्षांतर न करण्याची शपथ प्रथम पणजी येथील श्री महालक्ष्मीदेवीसमोर आणि नंतर बांबोळी येथील फुलांचो खुरीस चॅपेल या ठिकाणी घेतली. या वेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, मायकल लोबो, डिलायला लोबो, धर्मेश सगलानी यांच्यासह पक्षाच्या ४० पैकी एकूण ३६ उमेदवारांची उपस्थिती होती, तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय नेते पी. चिदंबरम् यांच्यासह प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचीही या वेळी उपस्थिती होती.

उमेदवारांना श्री महालक्ष्मीदेवीसमोर श्रीफळ ठेवून तेथील देवस्थानच्या पुजार्‍याने शपथ वाचून दाखवली आणि त्यांच्यामागून ती सर्वांनी म्हटली. ही शपथ पुढीलप्रमाणे आहे. ‘‘आम्ही निवडून आल्यावर पुढील ५ वर्षे ‘इकडून तिकडे’ न जाता काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहू. पक्षात राहून पक्षाचा विकास होईल, असे काम करू.’’ वर्ष २०१७ मध्ये काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून येऊनही पक्ष सरकार स्थापन करू शकला नाही, तसेच नंतर पक्षाच्या बहुतांश आमदारांनी पक्षांतर केल्याने पक्षाची दयनीय अवस्था झाली. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या उमेदवारांना देवीसमोर आणि चॅपलमध्ये पक्षांतर न करण्याची शपथ देण्यात आली.