‘आय.एन्.एस्. रणवीर’ या युद्धनौकेतील स्फोटात ३ सैनिकांचा मृत्यू !

  • भारतीय वायूदलातील लढाऊ विमाने ज्याप्रमाणे उडत्या शवपेट्या झाल्या आहेत, त्याप्रमाणेच आता भारतीय युद्धनौकाही अपघातग्रस्त होत असतील, तर ऐन युद्धाच्या वेळी भारताची सुरक्षा कशी असेल, याची कल्पना करता येत नाही ! – संपादक

  • काही वर्षांपूर्वी नौदलाच्या मुंबईतील तळावर आण्विक पाणबुडीला अपघात होऊन सहस्रो कोटी रुपयांची हानी झाली होती, त्यातून नौदल काहीच शिकले नाही, असे आता समजायचे का ? – संपादक
‘आय.एन्.एस्. रणवीर’

मुंबई, १९ जानेवारी (वार्ता.) – मुंबईतील नौदलाचा तळ असलेल्या नेव्हल डॉकयार्डमध्ये १८ जानेवारी या दिवशी ‘आय.एन्.एस्. (इंडियन नेव्हल शिप) रणवीर’ या युद्धनौकेमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटात नौदलाच्या ३ सैनिकांचा मृत्यू झाला, तर ११ सैनिक घायाळ झाले. घायाळ झालेल्यांवर नौदलाच्या रुग्णालयात उपचार चालू आहेत. या युद्धनौकेच्या अंतर्गत भागात हा भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर नौकेवरील कर्मचार्‍यांनी तातडीने पावले उचलत परिस्थिती नियंत्रणात आणली. या स्फोटात नौकेची फारशी हानी झालेली नाही. स्फोटाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात ‘अपघाती मृत्यू’ अशी नोंद करण्यात आली आहे. ‘आय.एन्.एस्. रणवीर’ ही युद्धनौका नोव्हेंबर २०२१ पासून पूर्व नौदल कमांडमधून येथे कार्यवाहीसाठी तैनात होती. ती लवकरच तिच्या तळावर परत जाणार होती.