कोरोनाच्या वाढत्या रुग्णवाढीमुळे संपूर्ण देशात दळणवळण बंदी लागू करण्याची आवश्यकता नाही ! – जागतिक आरोग्य संघटना

जागतिक आरोग्य संघटनेचे भारतातील प्रतिनिधी रॉड्रिको ऑफ्रिन

नवी देहली – भारतासारख्या देशात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण दळणवळण बंदी लागू करणे यांसारखी पावले हानी पोचवू शकतात. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर जीवन आणि रोजगार दोन्ही वाचवणे आवश्यक आहे, असे मत जागतिक आरोग्य संघटनेचे भारतातील प्रतिनिधी रॉड्रिको ऑफ्रिन यांनी व्यक्त केले. देशात सध्या २ ते अडीच लाख इतके दैनंदिन कोरोनाबाधित आढळत आहेत.

रॉड्रिको ऑफ्रिन पुढे म्हणाले की, कोरोनाच्या साथीचा सामना करण्यासाठी जोखमीनुसार बंदी घालण्याचे धोरण आखले पाहिजे. आम्ही प्रवासावर बंदी घालण्याची शिफारस करत नाही किंवा लोकांच्या हालचालींवर पूर्ण बंदी घालण्याचाही आग्रह धरत नाही. कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी कोरोना विषाणूचा नवीन प्रकार किती संसर्गजन्य आहे ? नवीन प्रकारामुळे होणारा रोग किती गंभीर आहे ? पूर्वी कोरोनाचा संसर्ग होऊन गेलेल्या व्यक्तीला लस किती संरक्षण देते ? सामान्य लोक या धोक्याकडे कसे पहातात अन् ते टाळण्यासाठी उपायांचे पालन कशा पद्धतीने करतात ? या ४ प्रश्‍नांची उत्तरे मिळाल्यानंतर योग्य निर्णय घेतला जावा.