आर्वी येथील सर्व गर्भपात स्त्री भ्रूणहत्येचाच प्रकार असण्याची शक्यता !

वर्धा येथील अवैध गर्भपाताचे प्रकरण

वर्धा – जिल्ह्यातील आर्वी येथे उघडकीस आलेल्या भ्रूणहत्या प्रकरणी संबंधित कदम खासगी रुग्णालयाच्या आवारातील बायोगॅस टाकीत आढळलेले मानवी अवशेष हे १४ आठवड्यांवरील भ्रूणांचे असावेत, असे सांगितले जात असून त्यात बहुतांश स्त्री भ्रूण असावेत, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. १४ जानेवारी या दिवशी पुन्हा पोलीस आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या पथकाने रुग्णालयाच्या परिसरात ५ घंटे खोदकाम केले. त्यात हाडाचा १ तुकडा आढळून आला.

या प्रकरणी कदम रुग्णालयाच्या संचालिका आणि आधुनिक वैद्या रेखा कदम यांना अटक करण्यात आली असून एक टोळी सक्रीय असल्याचे उघड झाले आहे. या रुग्णालयात आजवर अनेक भ्रूणहत्या झाल्या असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कायदेशीर गर्भपातासाठी वापरले जाणारे ‘मिजो प्रॉस्ट’ हे औषध केवळ शासकीय रुग्णालयात उपलब्ध होते. गर्भपातासाठी वापरण्यात आलेले औषध उपजिल्हा रुग्णालयातून मिळवण्यात आलेले असू शकते. त्यामुळे आरोपी आधुनिक वैद्या रेखा कदम आणि त्यांचे कुटुंबीय यांनी भ्रूणहत्येचे ‘रॅकेट’ चालवल्याचे स्पष्ट  झाले आहे.

ज्या सोनोग्राफीच्या आधारे गर्भपात केले जातात त्याच्याशी संबंधित रुग्णालयातील नोंदींची वर्षातून ३ वेळा पडताळणी व्हायला हवी; परंतु ती पडताळणी झालेली नाही. गर्भपात झाल्याप्रकरणी शासकीय वैद्यकीय अधिकार्‍यांच्या पथकाने कदम रुग्णालयात पडताळणी केली.