पुणे – त्यागभाव आणि सेवाभाव याचा आदर्श आताच्या तरुण पिढीने आपल्या आचरणात आणला पाहिजे. भारत आध्यात्मिक देश असून येथे प्रेम आणि शांती नांदते. युवा एकत्र आले, तर संपूर्ण विश्व शांतिमय होईल. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वामीजींचे विचार प्रेरणादायी ठरले. जीवनात कधी हार मानू नका आणि घाबरू नका, स्वामीजींच्या अशा विचारांमुळे प्रेरणा मिळाली. स्वामीजींचे विचार अधिकाधिक लोकांनी अवलंबले पाहिजेत, असे मत निवृत्त ब्रिगेडियर डॉ. सुनील बोधे यांनी व्यक्त केले. रामकृष्ण मठाच्या वतीने राष्ट्रीय युवादिन तसेच ‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमास रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी श्रीकांतानंद, भाग्यनगर येथील ‘व्हॅल्यू लॅब’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन राव आदींनी मार्गदर्शन केले.
अर्जुन राव म्हणाले, ‘‘व्यक्ती, संस्था आणि राष्ट्र यांची प्रगती होण्यासाठी मनाची अध्यात्मिक प्रगतीही होणे तितकेच आवश्यक आहे, तसेच मन शांत आणि शुद्ध असणेही अत्यंत आवश्यक आहे.’’