श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या मुंबई जवळील दैवी प्रवासाचा वृत्तांत !
१. महर्षींनी सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंना गणेशपुरी येथे स्वामी नित्यानंद यांचे समाधीस्थान आणि वज्रेश्वरी येथील वज्रेश्वरीदेवीचे मंदिर या ठिकाणी जाऊन आशीर्वाद घेण्यास आणि आश्रमासाठी गणेशपुरी येथील गरम पाण्याच्या कुंडातील पाणी घेण्यास सांगणे
‘१.३.२०२० या दिवशी बेंगळुरू येथे झालेल्या सप्तर्षी जीवनाडीपट्टीवाचन क्रमांक १४२ मध्ये महर्षि म्हणाले, ‘कार्तिकपुत्री (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ) यांच्या जन्माचे रहस्य महर्षींनी अनेक सहस्र वर्षांपूर्वी लिहून ठेवले होते. त्याचप्रमाणे महर्षींनी त्यांच्या दैवी प्रवासाविषयीही लिहिले आहे. ‘त्यांचा पुढील प्रवास मुंबईच्या दिशेने आहे. त्यांनी विरार, मुंबई जवळील गणेशपुरी आणि डहाणूजवळ असलेला महालक्ष्मीगड येथे जायचे आहे. गणेशपुरी येथे स्वामी नित्यानंद यांची समाधी आहे. त्या ठिकाणी जाऊन सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘सनातन संस्थेला आपला आशीर्वाद असू दे’, अशी प्रार्थना करायची आहे आणि गणेशपुरी येथील गरम पाण्याच्या कुंडातील पाणीही आश्रमासाठी आणायचे आहे. त्यानंतर त्यांनी गणेशपुरीच्या जवळ असलेल्या वज्रेश्वरी येथील वज्रेश्वरीदेवीच्या मंदिरात दर्शनासाठी जायचे आहे.’
२. गणेशपुरी येथील स्वामी नित्यानंद यांच्या समाधीस्थानी गेल्यावर आलेल्या दैवी अनुभूती
२ अ. स्वामी नित्यानंद यांच्या समाधी मंदिरातील पुजार्यांनी ‘सद्गुरु (सौ.) गाडगीळ यांच्या हस्ते स्वामी नित्यानंद यांची कापूरारती करूया’, असे सांगणे : ५.३.२०२० या दिवशी महर्षींनी सांगितल्याप्रमाणे सद्गुरु गाडगीळकाकू यांनी गणेशपुरी येथे जाऊन स्वामी नित्यानंद यांच्या समाधीस्थानाचे दर्शन घेतले. तेव्हा सकाळचे ११.१५ वाजले होते. ११.३० वाजता समाधीस्थानी नेहमीची महाआरती होणार होती. तेथील पुजारी म्हणाले, ‘‘आपण सद्गुरु गाडगीळकाकूंच्या हस्ते नित्यानंद स्वामींची कापूरारती करूया आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पपूर्तीसाठी ‘हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर होऊ दे’, अशी प्रार्थना करूया.’’ नित्यानंद स्वामींच्या कृपेनेच आम्हाला महाआरतीच्या आधीच स्वामींची कापूरारती करण्याचे सौभाग्य लाभले.
२ आ. स्वामी नित्यानंद यांच्यासाठी शिर्याचा प्रसाद ठेवणे : कापूरारती करत असतांना मंदिराच्या एका सेवकाने सत्यनारायणाच्या पूजेसाठी असतो, तसा शिर्याचा नैवेद्य नित्यानंद स्वामींच्या समोर आणून ठेवला.
२ इ. पुजार्यांनी स्वामी नित्यानंद यांच्या समाधीवरील तुळशीचा हार सद्गुरु गाडगीळकाकूंना प्रसादरूपात देणे : कापूरारती झाल्यावर पुजार्यांनी सद्गुरु गाडगीळकाकू यांना नित्यानंद स्वामींच्या समाधीवर घातलेला तुळशीचा हार प्रसादरूपात दिला.
या सर्व घटनांवरून ‘स्वामी नित्यानंद आणि सत्यनारायण स्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले एकच आहेत’, अशी अनुभूती आम्हाला आली.
३. सद्गुरु गाडगीळकाकूंनी पू. संदीप आळशी यांच्या घरी जाऊन त्यांच्या आई-वडिलांची भेट घेणे
आजपर्यंत सद्गुरु गाडगीळकाकूंना दैवी प्रवासाच्या निमित्ताने गणेशपुरी येथे जाण्याचा योग आला नव्हता. सनातन संस्थेच्या इतिहासात गणेशपुरी हे स्थान २ गोष्टींसाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे.
३ अ. गणेशपुरी हे सनातनच्या ग्रंथांचे अध्वर्यू पू. संदीप आळशी यांचे जन्मस्थान असणे : एक वैशिष्ट्य म्हणजे गणेशपुरी हे स्थान सनातनचे संत आणि सनातनच्या ग्रंथकार्यातील मेरुमणी पू. संदीप आळशी यांचे जन्मस्थान आहे. स्वामी नित्यानंद यांच्या समाधी मंदिराच्या समोरच त्यांचे घर आहे. सद्गुरु गाडगीळकाकूंनी पू. संदीप आळशी यांच्या घरी जाऊन त्यांच्या आई-वडिलांची (श्री. गजानन आळशी आणि (सौ.) इंदिरा आळशी, उभयतांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) भेट घेतली आणि म्हणाल्या, ‘‘अप्पा आणि आई, तुम्ही आणि तुमच्या या घराने सनातन संस्थेला पू. संदीप आळशी यांच्या रूपात एक अनमोल संतरत्न दिले आहे.’’ (सौ. इंदिरा आळशी यांचे १८.५.२०२० या दिवशी निधन झाले.)
३ आ. स्वामी मुक्तानंद यांनी त्यांचे श्री गुरु स्वामी नित्यानंद यांच्या स्तुतीपर लिहिलेली ‘ज्योतसे ज्योत जगाओ’ ही आरती प.पू. भक्तराज महाराज यांच्या कृपेमुळे सनातन संस्थेला मिळणे : गणेशपुरीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे स्वामी नित्यानंद यांचे शिष्य स्वामी मुक्तानंद यांनी श्री गुरूंच्या सहवासात असतांना सद्गुरु स्वामी नित्यानंद यांची स्तुती करत ‘ज्योतसे ज्योत जगाओ’ ही आरती लिहिली होती. सनातन संस्थेचे प्रेरणास्थान असलेले प.पू. भक्तराज महाराज यांच्या कृपेमुळे सनातन संस्थेला ही सुंदर आरती लाभली. गेली ३० वर्षे सनातनच्या सहस्रो साधकांची ही आरती म्हणत असतांना भावजागृती होते. ‘सनातन संस्थेचे प्रेरणास्थान असलेले प.पू. भक्तराज महाराज यांचे जन्मशताब्दी वर्ष चालू असतांना या ठिकाणी जाण्याचा योग येणे, हाही एक प्रकारे गुरुपरंपरेचा सनातन संस्थेला लाभलेला आशीर्वादच आहे’, असे आम्हाला जाणवले. यासाठी आम्ही सनातनचे सर्व साधक स्वामी मुक्तानंद आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.
गणेशपुरी येथे स्वामी मुक्तानंद यांनी स्थापन केलेला आश्रम आहे. त्या ठिकाणी त्यांचीही समाधी आहे. त्या ठिकाणीही सद्गुरु गाडगीळकाकू जाऊन आल्या.
४. गणेशपुरी येथील गरम पाण्याच्या कुंडांचा महिमा
त्यानंतर सद्गुरु गाडगीळकाकूंनी महर्षींनी सांगितल्याप्रमाणे गणेशपुरी येथील गरम पाण्याच्या कुंडातील पाणी आश्रमासाठी घेतले. गणेशपुरी आणि वज्रेश्वरीच्या परिसरात अनेक गरम पाण्याची कुंडे आहेत. ‘येथे तपोरत असलेल्या महर्षि वसिष्ठांसाठी देवतांनी ही गरम पाण्याची कुंडे निर्माण केली आहेत’, असे म्हटले जाते. ‘या गरम पाण्याच्या कुंडात स्नान केल्याने चर्मरोग दूर होतात’, असेही म्हटले जाते. यासाठी येथे अनेक भाविक येतात.
५. गणेशपुरीच्या जवळ असलेल्या वज्रेश्वरी गावात जाऊन वज्रेश्वरीदेवीचे दर्शन घेतांना आलेल्या अनुभूती
५ अ. सद्गुरु गाडगीळकाकू वज्रेश्वरीदेवीच्या मंदिरात गेल्यावर तेथील हिंदुत्वनिष्ठ पुजार्यांनी देवीच्या प्रसादरूपात एक श्रीफळ आणि देवीच्या गळ्यातील हार देणे : त्याच दिवशी सद्गुरु गाडगीळकाकूंनी गणेशपुरीजवळ असलेल्या वज्रेश्वरीदेवीच्या मंदिरात जाऊन पूजा केली. वज्रेश्वरीदेवीच्या मंदिराचे पुजारी श्री. पुरुषोत्तम हिंदुत्वनिष्ठ असून ते हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात अधून-मधून सहभागी होतात. सद्गुरु गाडगीळकाकू येथे आल्यावर त्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रार्थना केली. त्यांनी सद्गुरु गाडगीळकाकूंना वज्रेश्वरीदेवीच्या प्रसादरूपात एक श्रीफळ आणि देवीच्या गळ्यातील हार दिला.
५ आ. वज्रेश्वरीदेवीच्या प्रसादरूपात मिळालेला नारळ ‘एकाक्ष’ (एक डोळ्याचा नारळ) असणे आणि ‘एकाक्ष’ नारळामुळे ‘करणी आणि तंत्र-मंत्र’ यांचे त्रास दूर होत असणे : वज्रेश्वरीदेवीचे दर्शन घेऊन मुक्कामी आल्यावर ‘वज्रेश्वरीदेवीच्या प्रसादरूपात मिळालेले श्रीफळ एकाक्ष आहे’, असे सद्गुरु गाडगीळकाकूंच्या लक्षात आले. ‘एकाक्ष नारळ मिळणे’ हा सुयोग समजला जातो. ‘एकाक्ष नारळ मिळाल्याने आपल्यावरील ‘करणी आणि तंत्र-मंत्र’ यामुळे आलेले अरिष्ट दूर होते’, असे म्हटले जाते. विशेष म्हणजे २ दिवसांपूर्वीच ‘रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात एक डोळ्याचा नारळ असावा’, असे सप्तर्षींनी पू. (डॉ.) ॐ उलगनाथनजी यांच्या माध्यमातून सांगितले होते. महर्षींनी सांगितलेल्या या दैवी प्रवासातील पहिल्या २ दिवसांतच वज्रेश्वरीदेवीच्या कृपेने असा एकाक्ष नारळ प्रसाद म्हणून मिळाला. ‘हा ईश्वराचा आशीर्वादच होता’, असे आम्हाला जाणवले. ‘एकाक्ष नारळ प्रसाद म्हणून मिळाल्याने सनातन संस्थेवरील एक मोठे अरिष्ट दूर झाले असून पुढील ६ मास सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी हा नारळ दैवी प्रवासात समवेत बाळगायचा आहे’, असे पू. (डॉ.) ॐ उलगनाथनजी यांनी सांगितले.
६. वज्रेश्वरीचे स्थानमाहात्म्य
वसिष्ठ ॠषि वज्रेश्वरी आणि गणेशपुरी या परिसरात तपश्चर्या करत होते. त्यांनी येथे एक याग करायचे ठरवले आणि त्यासाठी सर्व देवतांना बोलावले; पण इंद्राला बोलावले नाही. तेव्हा इंद्राला फार राग आला आणि त्याने त्याच्या वज्रास्त्राचा प्रयोग वसिष्ठ ऋषींवर केला. तेव्हा वसिष्ठ ऋषींनी आदिशक्तीचा धावा केला. आदिशक्ती जगदंबा प्रकट झाली आणि तिने इंद्राचे वज्र झेलले आणि देवी अंतर्धान पावली. हे सर्व जिथे घडले, ते स्थान म्हणजे वज्रेश्वरीदेवीचे स्थान होय !’
– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), मुंबई (७.३.२०२०)
(टीप – हे लिखाण महर्षींनी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ असे संबोधण्यापूर्वीचे असल्याने येथे त्यांचा उल्लेख ‘सद्गुरु’ असा केला आहे.)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |