मानकर्‍यांच्या उपस्थितीत श्री सिद्धरामेश्वरांचा विवाह सोहळा उत्साहात !

कोरोना संसर्गामुळे ठराविक मानकरी आणि पदाधिकारी यांची उपस्थिती

सोलापूर – ‘हर हर महादेव’, ‘एकदा भक्त लिंग हर बोला हर…’ च्या जयघोषाने श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर दणाणून गेला. ‘दिड्डम्, दिड्डम्, सत्यम्, सत्यम्…’ या संमती वाचनाने, तसेच मानकरी आणि पोलीस प्रशासन यांच्या उपस्थितीत श्री सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाशी कुंभार कन्येचा विवाह सोहळा पार पडला. प्रतिवर्षी संपूर्ण १ मास चालणार्‍या श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेत ५ दिवस मुख्य धार्मिक विधी होतात, तसेच नंदीध्वज मिरवणूक होते; मात्र कोरोना संसर्गामुळे मंदिर समितीचे पदाधिकारी, मानकरी, पुजारी अशा १०० जणांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले.

या अक्षता सोहळ्याच्या प्रसंगी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रणिती शिंदे, देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी, पोलीस आयुक्त हरीष बैजल यांसह अन्य मानकरी आणि मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.