गोव्यात पुढील आठवड्यात प्रतिदिन १० ते १५ सहस्र कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याची शक्यता ! – डॉ. शेखर साळकर, कोरोना कृती दलाचे सदस्य

डॉ. शेखर साळकर, कोरोना कृती दलाचे सदस्य

पणजी – गोव्यात २० जानेवारीपासून प्रतिदिन कोरोनाबाधित १० ते १५ सहस्र नवीन रुग्ण आढळण्याची शक्यता आहे, अशी माहिती कोरोना कृती दलाचे सदस्य डॉ. शेखर साळकर यांनी दिली. ते पुढे म्हणाले, ‘‘कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’च्या संसर्गाचे प्रमाण कोरोनाच्या इतर सर्व प्रकारांच्या तुलनेत ३ ते ४ पटींनी अधिक आहे आणि यामुळे प्रतिदिन कोरोनाबाधित नवीन रुग्ण आढळण्याची संख्या वाढत आहे; मात्र त्यानंतर कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण अल्प होत जाणार आहे. कोरोनाच्या नवीन प्रकारच्या संसर्गामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. कोरोनाबाधित झालेल्या १४ सहस्र रुग्णांपैकी केवळ ७ रुग्णांवर गंभीर स्वरूपाचे वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि राज्यातील आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडणार नाही, याची काळजी घ्यावी. राज्यातील अनेक डॉक्टर आणि परिचारिका यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.’’

राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून बैठका घ्याव्या ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ जानेवारी या दिवशी गोव्यासह देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला आणि आरोग्य सुविधांवर भर देण्याचे निर्देश दिले. राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून सभा किंवा बैठका घ्याव्या, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.

शासकीय केंद्रांमधून कोरोनाविषयक चाचणीचे अहवाल उशिरा मिळणे आणि खासगी कोरोना चाचणी केंद्रांनी नियम डावलून अधिक दर आकारणे यांमुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय !

गोव्यात कोरोनाची तिसरी लाट आलेली असतांना शासकीय केंद्रांमधून कोरोना चाचणीचे अहवाल उशिरा मिळत आहेत आणि खासगी कोरोना चाचणी केंद्रे नियम डावलून अधिक दर आकारत असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. काही प्रकरणांमध्ये शासकीय केंद्रांमध्ये कोरोनाची चाचणी केलेल्यांचा अहवाल येण्यास तब्बल ४ ते ५ दिवस लागत आहेत. काही जणांना कोरोनाची चाचणी केल्यानंतर त्याच्या अहवालाविषयी त्यांच्या भ्रमणभाषमध्ये ‘एस्.एम्.एस्.’ (लघुसंदेश) आलेला नाही. कोरोनाच्या चाचणीचा अहवाल मिळण्यास मोठ्या प्रमाणावर विलंब होत असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिक आता खासगी कोरोना केंद्रात चाचणी करणे पसंत करू लागले आहेत. गोवा शासनाच्या आरोग्य खात्याने कोरोनासंबंधी चाचणीच्या दर आकारणीवर निर्बंध लादलेले असले, तरी त्याचे अनेक चाचणी केंद्रे पालन करत नसल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे नागरिकांच्या गैरसोयीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.