पौष शुक्ल पक्ष दशमी (१२.१.२०२२) या दिवशी चि. ओजस्वी अमित सरोदे हिचा चौथा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिचे आई-वडील आणि आजी यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
चि. ओजस्वी अमित सरोदे हिला चौथ्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
‘वर्ष २०१९ मध्ये ‘चि. ओजस्वी अमित सरोदे महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आली असून ती ६३ टक्के पातळीची आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२२ मध्ये तिची पातळी ६४ टक्के झाली आहे. आता तिच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे तिची साधनेत प्रगती होत आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. वय १ ते ३ वर्षे
१ अ. व्यवस्थितपणा : ‘एखादी वस्तू घेतल्यावर ओजस्वी नंतर ती वस्तू ठरलेल्या ठिकाणी ठेवते, उदा. औषधे, अंथरूण इत्यादी.
१ आ. ती लहान असूनही पाल, उंदीर इत्यादींना घाबरत नाही.
१ इ. पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांचा ‘बालकभावातील चित्रे’ हा ग्रंथ ती सतत स्वतःच्या समवेत ठेवते आणि ग्रंथ पहातच झोपी जाते.
१ ई. श्रीकृष्णाशी बोलणे : ओजस्वी सतत श्रीकृष्णाशी बोलत असते. ती म्हणते, ‘कृष्णाबाप्पा, ये. तू कुठे गेला आहेस ? असे का करतोस ? लवकर ये.’ नंतर ती आम्हाला सांगते, ‘‘कृष्णबाप्पा आला. तो पहा कृष्णबाप्पा !’’
– श्रीमती सुमती सरोदे (आजी (वडिलांची आई)), वाराणसी
१ उ. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता
१ उ १. सूक्ष्मातून वाईट शक्ती, साप इत्यादी दिसणे : ‘पितृपक्षाच्या कालावधीत ती अनेक वेळा सांगायची, ‘‘पुष्कळ ‘बु’ (ओजस्वीच्या भाषेत ‘बु’ म्हणजे वाईट) माणसे आली आहेत.’’ ती कधी कधी ‘छतावर साप आहे’, असे सांगायची. (त्या वेळी तिला सापाविषयी माहिती नव्हती.) सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी तिने आम्हाला सांगितले, ‘‘सर्व ‘बु’ (वाईट) माणसे कृष्णबाप्पाकडे चालली आहेत.’’
१ उ २. ओजस्वीने मंदिरात न जाता दुरूनच ते श्रीकृष्णाचे मंदिर असल्याचे सांगणे : एकदा आम्ही बोरी (फोंडा) येथे गेलो असतांना ओजस्वीला दुरून एक मंदिर दाखवले. तेव्हा तिने ‘ते कृष्णबाप्पाचे मंदिर आहे’, असे सांगितले. नंतर सहसाधकांना विचारले असता त्यांनी ते कृष्णाचे मंदिर असल्याचे सांगितले.’
– सौ. अदिती अमित सरोदे (चि. ओजस्वीची आई), फोंडा, गोवा.
२. वय ३ ते ४ वर्षे
२ अ. ‘ती नामजपादी उपाय आवडीने करते.
२ आ. ती मला स्वतःकडून झालेली चूक लगेच सांगते.’
– श्रीमती सुमती सरोदे
२ इ. भक्तीसत्संग ऐकायला आवडणे : ‘ओजस्वी नेहमी भक्तीसत्संग ऐकते. तिला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा आवाज आणि भक्तीसत्संगातील भक्तीगीते विशेष आवडतात. काही दिवसांपूर्वी सत्संगात प.पू. गुरुदेवांच्या खोलीतील नाद ऐकवला होता. ओजस्वीला तो नाद पुष्कळ आवडला. ती मला ‘तो नाद दिवसभर लाव’, असे सांगत होती. त्या रात्री तिने जागून रात्रीचा भक्तीसत्संग ऐकला. त्यानंतर होणार्या प्रत्येक भक्तीसत्संगात ‘नाद येतो का ?’, याची ती वाट पहात असते.
२ ई. सणांच्या आधीपासूनच त्या त्या देवतांच्या अनुसंधानात असणे : ती श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आधीपासून श्रीकृष्ण, पितृपक्षात दत्त, गणेशोत्सवापूर्वी श्री गणेश, नवरात्रापूर्वी श्री दुर्गादेवी आणि महाशिवरात्रीपूर्वी शिव यांच्या अनुसंधानात असते. ती खेळतांना अनेक वेळा देवतांना मोठ्याने हाक मारून बोलावते.
२ उ. ओजस्वीचे शिवाशी असलेले अनुसंधान !
२ उ १. महाशिवरात्रीच्या आधीच्या भक्तीसत्संगात महाशिवरात्रीचा विषय घेण्यात आला होता. त्यानंतर ओजस्वी सतत शिवाच्या अनुसंधानात होती.
२ उ २. महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर शिवाच्या अनुसंधानात असणे
अ. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तिने सज्जात उभे राहून नामजप करत अनुमाने एक घंटा मंदिरात लावलेली शिवाची भक्तीगीते ऐकली. तिने शिवाच्या मंदिरात गेल्यावर अर्धा घंटा नामजप केला.
आ. तिने सूक्ष्मातून शिवबाप्पाला पाळण्यात बसवण्यापूर्वी तिच्याकडील पाळणा स्वच्छ केला. नंतर तिने पाळण्याला हळूवारपणे झोका दिला. तेव्हा ती वेगळ्याच भावावस्थेत होती. प्रत्यक्षात तिला या कृती कुणीही शिकवल्या नाहीत.
इ. आम्ही दोघी मिळून पाळण्याला झोका देत असतांना मला आध्यात्मिक स्तरावर लाभ होत होते. ओजस्वीमधील भावामुळे ‘प्रत्यक्ष शिव तेथे आला आहे’, असे मला जाणवले.
२ उ ३. ‘ओजस्वीचे शिवाशी चांगले अनुसंधान असून तिची मागच्या जन्मीची साधना आहे’, असे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगणे : एकदा ती हाताची वरद मुद्रा (आशीर्वाद देणारी मुद्रा) करून पाळण्यात झोपली होती. तेव्हा तिचा तोंडवळा पुष्कळ तेजस्वी दिसत होता. त्यानंतर मला आध्यात्मिक स्तरावर लाभ झाले. मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना याविषयी सांगितल्यावर ते मला म्हणाले, ‘‘तिचे शिवाशी चांगले अनुसंधान आहे. तिच्याकडे बघून चांगले वाटते. तिची मागच्या जन्मीची साधना आहे आणि ती सर्व मनापासून करत आहे. हे कौतुकास्पद आहे.’’
२ ऊ. संतांना भेटण्याची ओढ : डिसेंबर २०२१ मध्ये ओजस्वीने पू. भार्गवराम (सनातनचे पहिले संत पू. भार्गवराम प्रभु (वय ४ वर्षे)) यांची आठवण काढली. त्यानंतर २ – ३ दिवसांनी ते रामनाथी आश्रमात आले असल्याचे आम्हाला कळले. मी ओजस्वीला रामनाथी आश्रमात घेऊन गेले. ती नेहमीप्रमाणे आश्रमातील हनुमान मंदिरासमोर उभी न रहाता मंदिराच्या मागे उभी राहिली. तिला अनुमाने एक घंट्याने पू. भार्गवराम दुरून दिसले. त्या दोघांनी एकमेकांना लांबूनच हात दाखवला आणि भेटल्याचा आनंद व्यक्त केला.
२ ए. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा : एकदा मी तिला सहज म्हणाले, ‘‘ओजस्वी, मी तुझ्यामध्ये फार गुंतले आहे गं !’’ तेव्हा ती मला म्हणाली, ‘‘आई, मीही तुझ्यात फार गुंतले आहे.’’ नंतर मी तिला म्हटले, ‘‘बाळा, आपले कसे होणार ?’’ तेव्हा ती मला म्हणाली, ‘‘काही नाही. प.पू. बाप्पा (परात्पर गुरु डॉ. आठवले) आपला गुंता सोडवतील.’’ ‘एरव्ही ती देवतांच्या अनुसंधानात असते; पण या प्रसंगात तिने प.पू. गुरुदेवांचे स्मरण केले’, याचे मला नवल वाटले.’
– सौ. अदिती अमित सरोदे
२ ऐ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव : ‘जुलै २०२१ मध्ये आम्ही गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम ‘ऑनलाईन’ पाहिला. आम्ही घरी पूजा केली. तेव्हा ओजस्वी फुले वहात होती. मला अकस्मात् काहीतरी साहित्य देण्यासाठी रामनाथी आश्रमात जायचे होते. ओजस्वी आश्रमात येण्यासाठी माझ्या मागे लागली. त्यामुळे मी तिला घेऊन गडबडीत निघालो. ती हातात एक डबी घेऊन गाडीत बसली. मी तिला त्याविषयी विचारल्यावर ती मला म्हणाली, ‘‘मी परम पूज्य बाप्पांच्या चरणांवर वहायला फुले घेतली आहेत.’’ मी घाईत असल्याने मी आश्रमाच्या आत गेलो नाही. तेव्हा ओजस्वी परम पूज्य बाप्पांच्या चरणांवर फुले वहाण्यासाठी आग्रह करू लागली. त्या वेळी तिने आश्रमाच्या बाहेर एका उंबरठ्यावर फुले वाहिली आणि स्वतःभोवती प्रदक्षिणा घातल्या.’ – श्री. अमित सरोदे (वडील), फोंडा, गोवा.
२ ओ. संतांनी काढलेले कौतुकोद्गार !
१. ‘एकदा मी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याकडे सेवेला असतांना ओजस्वीचा विषय निघाला. तेव्हा मी त्यांना तिच्याविषयी सांगितले. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘ती लवकर संत होईल !’’
२. ७ – ८ मासांपूर्वी आमची सद्गुरु सत्यवान कदम यांच्याशी भेट झाली असता ते म्हणाले, ‘‘ओजस्वी खरेच तेजस्वी आहे.’’
३. ओजस्वीमधील स्वभावदोष
इतरांमध्ये सहजपणे न मिसळणे, स्वतःची वस्तू इतरांना न देणे, ऐकण्याची वृत्ती नसणे आणि भावनाशीलता’
– सौ. अदिती अमित सरोदे
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २६.१२.२०२१)