कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात पुन्हा निर्बंध, रात्र संचारबंदीसह समारंभांवर बंधने !

मुंबई – राज्यात वाढत्या कोरोनाच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य सेवेचा आढावा घेतला. त्यानंतर कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी ८ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून राज्यात कडक निर्बंध पुढीलप्रमाणे लावण्यात आले आहेत. नियमावलीत धार्मिक स्थळांविषयी कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही.

१. १५ फेब्रुवारीपर्यंत शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.

२. रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात सर्वत्र संचारबंदी, तर ‘नाईट कर्फ्यू’ घोषित करण्यात आला आहे. दिवसा जमावबंदी लागू करण्यात आली असून ५ पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही.

३. अत्यावश्यक कामाविना बाहेर पडण्यास निर्बंध आहे.

४. सरकारी कार्यालयात भेटणार्‍यांना प्रतिबंध, आवश्यकता असल्यासच मुख्य कार्यालयाची लेखी अनुमती आवश्यक असणार आहे.

५. खासगी कार्यालयांच्या ५० टक्के कर्मचार्‍यांना घरून काम करण्याचे आदेश दिले आहेत.

६. लग्न समारंभासाठी ५० जणांना; अंत्यसंस्कारासाठी २० जणांना; सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रम यांसाठी ५० जणांना उपस्थित रहाण्याची अनुमती असणार आहे.

७. स्विमिंग पूल, स्पा, वेलनेस सेंटर, पूर्णपणे बंद ठेवण्यात यावेत.

८. व्यायामशाळा, ब्यूटी पार्लर, केशकर्तनालय ५० टक्के क्षमतेने चालू ठेवावीत, तसेच रात्री १० ते सकाळी ७ पर्यंत बंद ठेवावीत.

९. पर्यटनस्थळे, पार्क, प्राणी संग्रहालये, फोर्ट, म्युझियम, एंटरटेंमेंट पार्क पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवावेत.

१०. शॉपिंग मॉल आणि बाजार कॉम्पलेक्स ५० टक्के क्षमतेने चालू ठेवावेत.

११. उपाहारगृह ५० टक्के क्षमतेने चालू रहाणार, तसेच रात्री १० ते पहाटे ५ पर्यंत बंद ठेवावेत. खाद्यपदार्थ घरपोच सुविधा चालू रहाणार.

१२. नाट्यगृह, सिनेमागृह ५० टक्के क्षमतेने चालू रहाणार आहे. नाट्यगृह, सिनेमागृह यांमध्ये संपूर्ण लसीकरण झालेल्यांनाच अनुमती असणार; मात्र रात्री १० ते सकाळी ८ सिनेमागृह बंद ठेवण्यात यावीत.

१३. विमान, ट्रेन, बस किंवा खासगी वाहनाने राज्यात प्रवास करायचा असल्यास संपूर्ण लसीकरण किंवा आर्.टी.पी.सी.आर्.चा ७५ घंट्यांपूर्वीचा निगेटिव्ह अहवाल बंधनकारक आहे. चालक, क्लिनर आणि कर्मचारी यांनाही हा नियम लागू करण्यात आला आहे.