१. यजमानांना वेतन मिळत नसतांना आलेल्या अनुभूती
१ अ. यजमानांची नोकरी अनिश्चित कालावधीसाठी बंद असणे :
२२.३.२०२० या दिवसापासून देशात दळणवळण बंदी चालू झाली. त्या वेळी माझ्या यजमानांची नोकरी बंद झाली. त्यामुळे त्यांना प्रतिमास वेतन मिळत नव्हते. नंतर दळणवळण बंदीचा कालावधी वाढत गेल्याने नोकरी अनिश्चित कालावधीसाठी बंद असणार होती.
१ आ. धान्य अधिक काळ पुरणे :
आमच्याकडे २ मास पुरेल, इतका धान्यसाठा होता. त्यानंतर ‘घरातील व्यय कसा भागत होता ?’, हे लक्षातच आले नाही. एरव्ही एक मास पुरणारे गव्हाचे पीठ, धान्य हे त्या काळात दीड मासापेक्षा अधिक काळ पुरत होते. आम्हाला पैसेही कधीच अल्प पडले नाहीत.
१ इ. ‘गॅस सिलिंडर’ अधिक काळ चालणे :
पाणी गरम करण्यासाठी असलेल्या ‘गॅस गिझर’ला लावलेला ‘सिलिंडर’ ७ मास चालू होता. यजमानांना आठवड्यात २ वेळा बाहेर जावे लागत असल्याने दिवसातून २ वेळा अंघोळीसाठी गरम पाणी लागायचे. असे असूनही ‘सिलिंडर’ लवकर संपला नाही.
२. ‘अधिकोषातील मुदत ठेवीचे पैसे घरी आणूया’, असा विचार आल्यानंतर प.पू. डॉक्टरांची अनुभवलेली कृपा
२ अ. अधिकोषातील ‘ठेवीची मुदत कधी संपते’, हे बघण्यापूर्वीच प.पू. डॉक्टरांनी सूक्ष्मातून ‘त्याची काहीच आवश्यकता नाही’, असे सांगणे :
दळणवळण बंदी चालू झाल्यापासून अनुमाने २ – ३ मासांनंतर एकदा माझ्या मनात विचार आला, ‘मुदत ठेवीतील थोडे पैसे घरात आणून ठेवूया.’ यासाठी मी ‘ठेवीची मुदत कधी संपते’, हे बघणार होते. त्या क्षणी मला प.पू. डॉक्टरांचे सूक्ष्मातून दर्शन झाले. ते मला म्हणाले, ‘‘त्याची काहीच आवश्यकता नाही.’’ हे ऐकून माझी पुष्कळ भावजागृती झाली. प.पू. डॉक्टर साधकांच्या मनातील विचार तात्काळ जाणतात आणि त्यांना त्वरित सूक्ष्मातून मार्गदर्शनही करतात. त्यानंतर आजपर्यंत मी मुदत ठेवीची पावती पाहिलीही नाही. प.पू. डॉक्टरांच्या कृपेने तशी वेळही आली नाही.
२ आ. ‘प.पू. डॉक्टरांच्या कृपेने संतांकडून मिळालेला ‘लक्ष्मीप्रसाद’ (संतांनी पैशांच्या रूपात दिलेला प्रसाद ) घरात आहे. त्यामुळेही आम्हाला काहीच न्यून पडणार नाही’, असे मला वाटते.
३. कोरोनाच्या परिस्थितीतही स्थिर रहाता येणे
अ. या काळात आम्हाला थोडा ताप आणि सर्दी असे त्रास झाले होते. आम्ही आयुर्वेदिक औषधे घेतली आणि घरगुती उपचार केले. त्यामुळे आम्हाला बरे वाटले. या काळात ‘आता पुढे कसे होणार ?’, अशी काळजीही आम्हा दोघांना कधी वाटली नाही.
आ. यजमानांना बर्याच वेळा बाहेर जावे लागत असल्याने ‘त्यांना कोरोना होईल का ?’, असे विचार माझ्या मनात यायचे. त्यावर २ – ३ दिवस स्वयंसूचना दिल्याने ते विचार येणे बंद झाले.
इ. २५.१०.२०२० या दिवसापासून यजमानांची नोकरी पुन्हा चालू झाली. आता त्यांना प्रतिदिनच बाहेर जावे लागते; पण वरील काळजीचे विचार माझ्या मनात आले नाहीत.
४. ‘प.पू. डॉक्टरांनी साधकांना कवचात ठेवले आहे’, या संदर्भात दिसलेले दृश्य
आरंभीच्या काळात ‘प.पू. डॉक्टरांनी माझे मन त्यांच्या मुठीत ठेवले आहे’, असे दृश्य मला वारंवार दिसायचे. तेव्हा मला जाणवायचे, ‘बाह्य परिस्थितीचा मनावर परिणाम होऊ नये’, यासाठी त्यांनी सर्व साधकांना कवचात ठेवले आहे. त्यामुळे बाहेर एवढा आपत्काळ असूनही त्याची झळ आम्हाला जाणवली नाही. ‘ऑनलाईन’ सेवा आणि व्यष्टी साधनेचे प्रयत्न यांत दिवस कसा संपायचा’, हे आमच्या लक्षातही यायचे नाही.
५. कृतज्ञता आणि प्रार्थना
प.पू. डॉक्टर, आपण आमच्यासाठी जे काही करत आहात, ते सर्व शब्दातीत आहे. त्यासाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. आपल्या कृपेनेच हे सर्व अनुभवता आले. ‘आपल्याप्रतीचा भक्तीभाव निरंतर वाढू दे’, अशी आपल्या दिव्य चरणी आर्तभावाने प्रार्थना करते.’
– सौ. राजश्री खोल्लम, पुणे (१२.१२.२०२०)
|