रायगडावरील अवैध बांधकाम आणि रंगरंगोटी हटवून भगवे झेंडे लावले !

खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्राला केंद्रीय आणि मुंबई येथील पुरातत्व विभागाचा तात्काळ प्रतिसाद !

  • बहुतांश गडकिल्ल्यांवर धर्मांधांनी अवैध बांधकामे करून भूमी कह्यात घेणे, वस्ती वाढवणे, स्वतःचे प्रस्थ निर्माण करणे आदी गोष्टी करून हिंदूंच्या पराक्रमाचा आणि मोगलांच्या पराजयाचा इतिहास पालटण्याचे केलेले प्रयत्न खरेतर सरकारने स्वतःहून हाणून पाडायला हवेत ! – संपादक 
  • सत्य इतिहास पालटून हिंदूंचे खच्चीकरण करण्याच्या आणि समवेत ‘भूमी जिहाद’ करून हिंदूंचे अस्तित्व नष्ट करण्याच्या षड्यंत्राला हाणून पाडण्यासाठी समस्त हिंदूंनी संघटित होऊन वैध मार्गाने विरोध करावा ! – संपादक 
  • पुरातत्व विभागाच्या कह्यात असलेल्या अशा सर्वच ठिकाणांच्या संदर्भात असे प्रकार होऊ नयेत, यासाठी कडक धोरण अवलंबले पाहिजे ! – संपादक 

पनवेल (जिल्हा रायगड)- किल्ले रायगडावरील ‘मदार मोर्चा’ या ठिकाणी काही दिवसांपूर्वी काहींनी रंगरंगोटी करून त्यावर चादर घालून तिथे प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न केल्याचे शिवप्रेमींनी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांना निदर्शनास आणून दिले होते. रायगडावरील ‘टकमक टोका’ला समांतर राहून गडाखाली आल्यावर शत्रूवर मारा करण्यासाठी पूर्वी एक चौकी होती, त्या भागाला आता ‘मदार मोर्चा’ म्हणतात. शिवप्रेमींनी सांगितल्यानुसार देहलीमधील भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचालिका आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या मुंबई विभागाचे अधीक्षक यांना खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्र पाठवले. ‘या ठिकाणी करण्यात आलेली रंगरंगोटी हटवून तिथे कोणत्याही प्रकारचे नवीन बांधकाम अथवा रचना करण्यास तात्काळ पायबंद घालण्यात यावा’, अशी मागणी या पत्राद्वारे केली होती, तसेच संपर्क करूनही याविषयी सांगितले. त्याला तात्काळ प्रतिसाद देत केंद्रीय पुरातत्व विभागाच्या महासंचालिका विद्यावती आणि मुंबई पुरातत्व विभागाचे अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ राजेंद्र यादव यांनी ‘मदार मोर्चा’ येथील रंगरंगोटी हटवून ते ठिकाण पूर्ववत् केले, तसेच तेथे सुरक्षारक्षकाचीही नेमणूक केली. वरील माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सामाजिक माध्यमांतून दिली आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुरातत्व खात्याला पाठवलेल्या पत्रात म्हटले होते, ‘ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाच्या नियमांमध्ये या गोष्टी प्रतिबंधित असतांना रायगडासारख्या ऐतिहासिक ठिकाणी अशा गोष्टी होणे अतिशय चुकीचे आहे. किल्ले रायगडचे पावित्र्य आणि ऐतिहासिक महत्त्व अबाधित रहावे.’

काही शिवप्रेमींनी त्यांना रायगडावरील मदार मोर्चा येथे काही दगडांना रंग देऊन, तिथे हिरवा झेंडा लावल्याचे आणि त्यांवर चादर टाकल्याचे, तसेच तिथे मुसलमान जात असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. तशा प्रकारची छायाचित्रे आणि व्हिडिओ सामाजिक माध्यमांत फिरत होते.