|
चीन भारताच्या विरोधात युद्धाची सिद्धता करत आहे. चीनने भारतावर आक्रमण करण्याची वाट न पहाता भारताने चीनपेक्षा अधिक सिद्धता करून चीनवर आक्रमण केले पाहिजे. ‘आक्रमण हाच बचावाचा सर्वांत चांगला मार्ग आहे’, असे म्हटले जाते, त्याचे अनुकरण भारताने करावे !
नवी देहली – चीन हा लडाखमधील भारत-चीन सीमेवरील चीनच्या नियंत्रणातील पँगाँग तलावाच्या भागावर पूल बांधत आहे. तसेच चीन दौलत बेग ओल्डी भागासमोर रस्ता बनवत आहे, असे वृत्त आहे. येथील सीमेवर सध्या चीनने ६० सहस्र सैनिक तैनात केले आहेत.
१. पँगाँग तलावाच्या भागात चीन पूल उभारत असल्याचे उपग्रहातून काढलेल्या छायाचित्रातून दिसून आले आहे. हे बांधकाम चीनच्या भागात होत आहे, असे भारतीय सूत्रांनी सांगितले. या पुलाद्वारे सैनिक आणि सैनिकी साहित्य यांची वाहतूक सोपी व्हावी, अशी चीनची इच्छा आहे. पुलामुळे चिनी सैनिक आणि रसद पुरवठ्याचे मार्ग खुले होतील. त्यामुळे चीन या भागांत अल्प वेळेत वेगाने अधिक सैनिकांना पोचवू शकतो.
२. चीनच्या हालचाली पाहून भारताने कुठल्याही संभाव्य आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी पावले उचलली आहेत, असे सूत्रांनी सांगितले. भारताने राष्ट्रीय रायफल्सची आतंकवादविरोधी तुकडी सीमेवर तैनात केली आहे. सीमेपर्यंत सैनिक आणि वाहने यांची वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी भारतही पायाभूत सुविधा उभारत आहे.