व्यक्तीने तरुण वयातच साधना करून मनाला आध्यात्मिक संस्कारांसहित घडवल्यास मृत्यू कमी क्लेशकारक आणि सुलभ होईल ! – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

१. कर्करोग झालेल्या माझ्या बहिणीने पूर्वी पुष्कळ नामजप आणि पारायणे केलेली असणे; मात्र आता तिला नामजप अन् देवाचे अन्य काही करायला नको वाटणे

‘माझी एक बहीण रुग्णाईत असून गेले २ – ३ मास ती कर्करोगाच्या यातना भोगत आहे. माझी आई (सनातनच्या ९० व्या संत पू.(सौ.) शैलजा परांजपेआजी) तिला भेटायला रुग्णालयात गेली होती. त्या वेळी पू. आईने तिला सांगितले, ‘‘तू नामजप कर. मी तुझ्या कानाजवळ तुला ऐकू येईल, असा नामजप लावून ठेवते.’’ पू. आईने तिच्या कानाजवळ ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप भ्रमणभाषवर लावून ठेवला. त्या वेळी बहीण ‘नको. ते बंद कर’, असे म्हणून ओरडू लागली. माझ्या या बहिणीला आधी नामजप करायला पुष्कळ आवडायचे. तिने अनेक वेळा रुद्र आणि सप्तशति यांची पारायणे केली आहेत. तिने अनेक वेळा नरसोबाच्या वाडीला जाऊन दत्त महाराजांचे दर्शन घेतले आहे. ती रामनाथी, गोवा येथील आश्रमात येऊन गुरुदेवांनाही (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) भेटून गेली आहे; परंतु आता तिला नामजप आणि देवाचे अन्य काही करायला नको वाटत आहे.

२. बहिणीच्या वागण्यामागील कारणमीमांसा

व्यक्ती शेवटच्या क्षणी शरिराला होणार्‍या यातनांनी कंटाळून जाते आणि ‘आता देवाचे काहीच करायला नको’, असे म्हणू लागते. ‘देवाने माझे काय चांगले केले ? मी जीवनभर देवाचे इतके केले’, असे त्या व्यक्तीचे म्हणणे असते.

३. हे टाळण्यासाठी ठेवायचे दृष्टीकोन

३ अ. अध्यात्म वरवरचे न जगता चित्तावर अध्यात्माचा संस्कार करणे आवश्यक ! : यावर दृष्टीकोन असा आहे, ‘अध्यात्म वरवर न जगता ते अंतर्मनातून जगले पाहिजे. म्हणजे अध्यात्माची आवड केवळ ‘देवळात जाणे, नामजप करणे, देवाला फुले वहाणे किंवा कथा-पुराणे ऐकणे’, यांपुरती मर्यादित नको. याला ‘मानसिक स्तरावरील अध्यात्म’ म्हणतात. वरवरचे कर्मकांड केल्याने मनात केवळ अध्यात्माची आवड निर्माण होते; परंतु चित्तावर अध्यात्माचा संस्कार होत नाही. यासाठी प्रत्यक्ष सेवा करणे, तसेच स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे अत्यंत आवश्यक असते.

३ आ. ‘प्रारब्धानुसार दुःख भोगत आहे’, याची मनाला जाणीव करून देणे : आपल्या मनाला जीवनभर समजवावे लागते, ‘मी माझ्या प्रारब्धानुसार दुःख भोगत आहे. मोठमोठ्या संतांनाही प्रारब्ध चुकलेले नाही, तर माझी काय कथा ?’

४. तरुण वयात साधना करून आयुष्याच्या शेवटच्या दिवसांची सिद्धता करून ठेवणे

या दृष्टीकोनातून आयुष्याच्या शेवटच्या दिवसांची सिद्धता तरुण वयातच साधना करून करावी लागते, तरच मृत्यूच्या मानसिक यातना सुलभ होतात आणि त्या वेळी यातना होत असतांनाही देवाची आठवण होते. यासाठी तरुण वयातच साधना करून मृत्यूच्या क्षणाला जिंकणे आवश्यक असते, नाहीतर वेळ टळते आणि अशा प्रकारच्या मृत्यूच्या मानसिक क्लेषांना सामोरे जावे लागते.

साधकांनो, केवळ आवड म्हणून वरवरचे अध्यात्म नको, तर स्वतः अध्यात्म जगले पाहिजे. स्वतःच्या मनाला सर्वच बाबतीत आध्यात्मिक संस्कारांसहित तरुण वयातच घडवले पाहिजे, तरच मृत्यू सुलभ आणि आनंददायी होईल !’

– श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ, कोळ्ळीमलई, तमिळनाडू. (१५.१.२०२१)