१. कु. वर्षा जबडे यांनी कुटुंबियांच्या आजारपणात त्यांची आध्यात्मिक स्तरावर घेतलेली काळजी
१ अ. कुटुंबियांच्या आजारपणात त्यांना संतांनी सांगितलेला नामजप करायला सांगणे आणि आईसाठी शेवटचे २-३ दिवस स्वत: नामजप करणे : ‘कु. वर्षाताईच्या (कु. वर्षा जबडे हिच्या) कुटुंबातील अनेक सदस्य एकाच वेळी रुग्णाईत होते. त्या वेळी दळणवळण बंदीमुळे तिला रामनाथी, गोवा येथील आश्रमातून अकलूज (जिल्हा सोलापूर) येथे घरी जाणे शक्य नव्हते. तिने संतांना विचारून त्या सर्वांना नामजप करायला सांगितला. वर्षाताईची आई नामजप करू शकत नव्हती. वर्षाताईने बहिणीकडून आईसाठी नामजप करवून घेतला. वर्षाताईच्या आईचे या आजारपणात निधन झाले. वर्षाताईने आईसाठी शेवटचे २ – ३ दिवस जप केला.
१ आ. संतांच्या मार्गदर्शनानुसार त्यांचे आज्ञापालन करणे : वर्षाताईच्या आईच्या निधनाच्या एक आठवडा आधीपासून प्रतिदिन पू. (सौ.) संगीता जाधवकाकू आणि पू. सुमनमावशी (पू. (श्रीमती) सुमन नाईक) वर्षाताईची भ्रमणभाषवरून विचारपूस करायच्या. त्या वेळी त्यांनी तिला आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन केले. त्यांनी ताईला ‘भावनेत न अडकता ‘साधिका’ म्हणून या प्रसंगात तिचे विचार कसे असायला हवेत ?’ याविषयी सांगून ‘तू साधिका असल्याने तुलाच घरातील सर्वांना आधार द्यायचा आहे. तुझ्या साधनेचाच घरातील सदस्यांना लाभ होणार आहे’, आदी सूत्रे सांगितली. वर्षाताईने संतांचे पूर्ण आज्ञापालन केले.
२. आईचे निधन झाल्यावर देवाप्रती दृढ श्रद्धा आणि साधना यांमुळे स्थिर रहाणे
२ अ. आईचे निधन झाल्याचे कळल्यावर भावनिक स्तरावर न रहाता सेवेतून चैतन्य मिळवणे : तिला आईच्या निधनाविषयी कळल्यावर ती ४ – ५ मिनिटे भावूक झाली; मात्र त्यानंतर ती लगेच स्थिर झाली. ती सेवेत पूर्ण मग्न राहिली. नंतरही तिच्या मनात आईविषयी विचार आले, तरी ती सेवाच करत राहिली. ती सतत सेवेत राहिल्याने सेवेतील चैतन्यामुळे तिची स्थिती पालटून तिने आनंदाची अनुभूती घेतली.
२ आ. पूर्वी आश्रमात असूनही मनाने घरी असणारी वर्षाताई आईच्या निधनानंतर स्थिर रहाणे, हा चमत्कार ! : वर्षाताई आश्रमात पूर्णवेळ साधनेसाठी आल्यावर काही कारणास्तव आरंभीची ३ वर्षे ती घरी गेली नव्हती. त्या कालावधीत ‘ती आश्रमात असली, तरी मनाने घरीच आहे’, असे आम्हाला वाटायचे. त्यांच्या एकत्र कुटुंबात तिचे कुटुंबियांशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याने तिला त्यांची पुष्कळ आठवण यायची आणि ती आम्हालाही त्यांच्याविषयी सांगायची; मात्र घरातील सदस्यांच्या आजारपणात आणि आईच्या निधनप्रसंगी ती स्थिर रहाणे, हा पालट चमत्कारासारखा आहे. तिच्यात स्थिरता हा दुर्मिळ गुण आहेच. ती केवळ कुटुंबियांविषयी भावनिक होत असे. देवाने तिला यातूनही पुढे नेले.
३. कृतज्ञता !
कठीण काळासाठी आमच्या मनाची सिद्धता करून घेणार्या, संतांच्या मार्गदर्शनाद्वारे साधनेची योग्य दिशा देणार्या आणि वर्षाताईच्या माध्यमातून शिकवणार्या परात्पर गुरुमाऊलींच्या चरणी कोटीश: कृतज्ञता !’
– कु. गीतांजली काणे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(२०.५.२०२१)