चित्तोडगडावरील ‘लेझर शो’मध्ये राणी पद्मावतीविषयी वादग्रस्त प्रसंग दाखवल्याने भाजपच्या खासदारांनी शो बंद पाडला !

(‘लेझर शो’ म्हणजे प्रकाश किरणांद्वारे पृष्ठभागावर चित्रमय कथा दाखवणे)

जयपूर (राजस्थान) – चित्तोडचे भाजपचे खासदार चंद्रप्रकाश जोशी यांनी चित्तोडगडावर नुकताच चालू करण्यात आलेला लेझर शो बंद पाडला. या लेझर शोमध्ये राणी पद्मावती आणि अल्लाउद्दीन खिलजी यांच्या संदर्भातील प्रसंग दाखवण्यात आला होता. हा प्रसंगच मुळात चुकीचा असल्याचे जोशी यांनी सांगत याला विरोध केल्याने हा लेझर शो बंद करण्यात आला. जिल्हा प्रशासनाने ‘लेझर शोमधील आक्षेप असलेला भाग काढून टाकला जाईल’, असे आश्‍वासन दिले आहे.

१३ व्या शतकामध्ये राजपुतानावर आक्रमण करण्याच्या सिद्धतेत असलेला देहलीचा सुलतान अलाउद्दीन खिलजी मेवाडमध्ये राजा रतन सिंह यांना भेटण्यासाठी आल्याची इतिहासात नोंद आहे; मात्र या वेळी रतन सिंह यांची पत्नी राणी पद्मावती यांच्या सौंदर्याच्या चर्चा ऐकून त्यांना पहाण्याची खिलजीला इच्छा असल्याची त्याने बोलून दाखवल्याची दंतकथा प्रचलित आहे. या वेळी रतन सिंह यांनी एका आरशामध्ये राणी पद्मावतीला पहाण्याची मुभा खिलजी याला दिल्याचे या कथेमध्ये सांगितले जाते. या कथेलाच राजपूत संघटना आणि भाजप नेहमी विरोध करतात.