|
रायगड – मागील २ वर्षे कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण जगात हाहाःकार माजला. या संकटाला आळा घालण्यासाठी शासन आणि प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यातून मार्ग काढत जनजीवन पूर्ववत् जरी झाले असले, तरी ‘ओमिक्रॉन’ सारख्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. अशा वेळी ३१ डिसेंबरला पार्ट्यांच्या माध्यमातून ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग पसरण्याची शक्यताही अधिक आहे. या काळात सार्वजनिक आरोग्य धोक्यात घालणे परवडणारे नाही. त्यामुळे ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने होणार्या सर्व प्रकारच्या सार्वजनिक साजरीकरणावर बंदी घालावी, तसेच ख्रिस्ती नववर्षारंभाच्या नावाखाली ३१ डिसेंबरच्या निमित्ताने गडकोट, पर्यटनस्थळे, ऐतिहासिक अन् सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, धुम्रपान, मेजवान्या करतांना होणारे अपप्रकार रोखले जावेत, या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या प्रतिनिधींसह विविध धर्मप्रेमींच्या वतीने रायगड जिल्ह्यात कोलाड, रोहा, नागोठणे, खालापूर, खोपोली आणि कर्जत या पोलीस ठाण्यांत, तर रोहा आणि पेण येथील तहसीलदार कार्यालयांत निवेदने देण्यात आली. खालापूर पोलीस ठाण्यात निवेदन देतांना जांभिवली, खालापूर येथील ग्रामपंचायत सदस्य, तसेच स्वराज्य सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष प्रमोद शिर्के आणि सचिव नरेंद्र पाटील, धर्मप्रेमी आनंद महाजन, अन् शशिकांत पाटील उपस्थित होते.
याच आशयाची निवेदने रायगड जिल्ह्यातील ४ महाविद्यालये आणि ६ शाळा यांमध्येही देण्यात आली. धाटाव येथील एम्.बी. मोरे फाऊंडेशन महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्याच्या संदर्भात प्राचार्य प्रसन्ना म्हासळकर, प्रा. नरेश घाग, प्रा. मयूर पाखर, प्रा. प्रतिमा भोईर यांचे विशेष सहकार्य लाभले.
नववर्ष गुढीपाडव्याला साजरे करण्याविषयी विविध माध्यमांतून प्रबोधन !
‘हिंदूंनी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नव्हे; हिंदु संस्कृतीनुसार नववर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला साजरे करावे’ असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रायगड जिल्ह्यात गेल्या २ आठवड्यांत ६ ठिकाणी व्याख्याने घेऊन आणि साप्ताहिक धर्मशिक्षणवर्गांतून करण्यात आले, तसेच फलक प्रसिद्धी, समाजमाध्यमे आदी माध्यमांतूनही याविषयी प्रबोधन करण्यात आले.