श्री. वासुदेव गोरल हे त्यांची पत्नी सौ. वर्धिनी हिच्यासह रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करतात. सौ. वर्धिनी यांना श्री. वासुदेव यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. सेवाभाव
१ अ. ‘श्री. वासुदेव रात्री झोपेपर्यंत सतत सेवेचे नियोजन करत असतात. कधी कधी त्यांच्याकडे तातडीच्या सेवा आल्या, तर ते झोपतही नाहीत. ते सतत ‘सेवा पूर्ण करायची आहे’, याच विचारात असतात. ते झोपलेले असतांनाही सेवा आली, तरी ते सेवेलाच प्राधान्य देतात.
१ आ. त्यांच्याकडे तातडीच्या सेवा पुष्कळ असतात. त्यांनी दिवस-रात्र सेवा केली, तरी त्यांना कधी त्रास होत नाही. कधी कधी मीच त्यांना सांगते, ‘‘तुम्ही रात्रंदिवस सेवा केली, तर त्रास होऊ शकतो. तुम्ही उत्तरदायी साधकांशी बोला.’’ तेव्हा ते म्हणतात, ‘‘देव माझी काळजी घेतो. तू असा विचार कधी करू नकोस.’’
२. ‘वासुदेव सतत सेवा करतो आणि आनंदी असतो’, असे संतांनी सांगितल्यावर भावजागृती होणे
एकदा मी संतांच्या खोलीत सेवेला गेले असता आमच्यामध्ये पुढील संभाषण झाले.
संत : ‘एक शिष्य दिवसरात्र गुरूंची सेवा करतो आणि आनंदी असतो’, हे तुला ठाऊक आहे का ?
मी : मला कळले नाही.
संत : अगं, बाहेर सेवा चालू आहे. तो उंच साधक आहे ना, तो सतत सेवा करत आहे. (त्या वेळी बाहेर बांधकामाची सेवा चालू होती. ती पहाण्यासाठी संत खोलीच्या आगाशीत गेले होते; म्हणून ते मला सांगत होते.)
मी : मी ओळखले नाही.
संत : अगं, वासुदेव !
त्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती झाली. इतके दिवस मी यजमानांकडे मानसिक स्तरावरच पहात होते. त्या वेळी मला ‘खरेच देवाचे त्यांच्याकडे लक्ष आहे’, ही प्रचीती आली. तेव्हापासून मी त्यांना सेवेच्या संदर्भात काहीच बोलत नाही. त्यांची सेवा देवाच्या चरणी पोचत असल्याचा मलाही आनंद झाला.
३. पत्नीला साधनेत साहाय्य करणे
३ अ. मानसिक स्तरावर न हाताळता अडचणींवर योग्य उपाययोजना सांगून साधनेच्या स्तरावर प्रयत्न करायला सांगणे : कधी कधी मला आध्यात्मिक त्रास होतो. तेव्हा ते मला सांगतात, ‘‘तू नामजपादी उपायांना जा. तुला बरे वाटेल. तू बसून राहिलीस, तर मनातील नकारात्मक विचार वाढतील. तू नामजपाकडे लक्ष दे. झोपू नकोस.’’ त्यांनी मला मानसिक स्तरावर कधीच हाताळले नाही. ते मला साधनेतील अडचणींवर योग्य उपाययोजना सांगतात आणि साधनेच्या स्तरावर प्रयत्न करायला सांगतात.
३ आ. व्यष्टी साधना आणि सेवा यांकडे लक्ष देण्यास सांगणे : ते मला नेहमी सांगतात, ‘‘तुझ्या व्यष्टी साधनेकडे लक्ष दे. काही अडचणी असतील, तर उत्तरदायी साधकांशी बोल. तू जर सेवेकडे लक्ष दिलेस, तर सेवेतील आनंद घेऊ शकशील.’’
४. भाव
४ अ. ‘आश्रमातील जेवण म्हणजे देवाचा प्रसाद आहे’, असा भाव असणे : माझी जेवणाच्या संदर्भात पुष्कळच आवड-नावड असते. ‘मला जेवण जात नाही. मला भाजी आवडत नाही’, असे सांगितल्यावर ते म्हणतात, ‘‘आपण जेवणाकडे देवाचा प्रसाद म्हणून पाहिले, तर असे विचार येत नाहीत. जेवण म्हणून पाहिले, तर असे विचार येतात. त्यावर पुष्कळ प्रयत्न केले पाहिजेत.’’ आता माझ्याकडून असे थोडेफार प्रयत्न व्हायला लागले आहेत.
४ आ. त्यांची देवावर पुष्कळ श्रद्धा आहे. ‘प्रत्येक गोष्टीत देव सर्वकाही करील’, असा त्यांचा भाव असतो.
५. प्रार्थना आणि कृतज्ञता
हे श्रीकृष्णा,‘आम्हा दोघांनाही शेवटपर्यंत तुझ्या चरणांजवळ ठेवून घे.’ गुरुमाऊली, ‘तुमच्या कृपेमुळेच मला साधनेत पदोपदी साहाय्य करणारे यजमान मिळाले आहेत’, यासाठी मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. वर्धिनी वासुदेव गोरल (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.५.२०२०)