पाकिस्तानने इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तांना बोलावून व्यक्त केली चिंता !

हरिद्वार येथील धर्मसंसदेतील वक्त्यांच्या मुसलमानांविषयीच्या कथित आक्षेपार्ह विधानांचे प्रकरण

पाकने भारतात मुसलमानांच्या विरोधात काहीही झालेले नसतांना अशा प्रकारची चिंता व्यक्त करण्यापेक्षा पाकमधील हिंदु, शीख आणि ख्रिस्ती या अल्पसंख्यांकांवर प्रतिदिन होणार्‍या अत्याचारांकडे लक्ष देऊन त्यांचे संरक्षण करण्याकडे लक्ष द्यावे ! – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानने इस्लामाबादमधील भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रभारी उच्चायुक्तांना बोलावून हरिद्वार येथील धर्मसंसदेत मुसलमानांच्या विरोधात कथित द्वेषपूर्ण भाषण देण्याच्या घटनांवरून चिंता व्यक्त केली आहे.

पाकिस्तानने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रभारी एम्. सुरेश कुमार यांना इस्लामाबादमधील उच्चायुक्तालयामध्ये बोलावले आणि हिंदुत्व समर्थक हे भारतीय मुसलमानांच्या नरसंहाराविषयी बोलत असल्यावरून चिंता व्यक्त केली. भारतासाठी ही अत्यंत निषेधार्ह गोष्ट आहे की, आयोजकांनी कोणतीही खंत व्यक्त केली नाही किंवा भारत सरकारने त्याचा निषेध केला नाही. संबंधितांवर कारवाईही झालेली नाही. भारतातील मुसलमानांंच्या भवितव्याचे भीषण चित्र समोर आले आहे. भारताने या द्वेषयुक्त भाषणांची आणि अल्पसंख्यांकांविरुद्धच्या व्यापक हिंसाचाराच्या घटनांची चौकशी करणे अन् भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजना करणे अपेक्षित आहे.