शासकीय यंत्रणा सुधारायची असेल, तर अधिकार्‍यांना असे प्रश्न विचारा की घाम सुटला पाहिजे ! – महेश झगडे, निवृत्त प्रधान सचिव

सांगलीत पत्रकारांची कार्यशाळा उत्साहात पार पडली

कार्यशाळेत उपस्थित पत्रकार

सांगली – अधिकारी सांगतील तेवढेच छापण्याची पद्धत पालटून नागरिकांच्या प्रश्नावर अधिकार्‍यांना घाम फोडणारे प्रश्न पत्रकारांनी विचारायला हवेत. त्यासाठी कायदे आणि नियम यांचा सूक्ष्म अभ्यास करायला हवा, असे मत राज्याचे निवृत्त प्रधान सचिव महेश झगडे यांनी व्यक्त केले. मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न ‘सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ’ आणि ग्राहक पंचायत यांच्या वतीने टिळक विद्यापिठाच्या सभागृहात ‘प्रखर पत्रकारितेसाठी चौथा स्तंभ अधिक धारदार’ या विषयावर पत्रकारांची कार्यशाळा पार पडली. त्या वेळी ते बोलत होते.

पत्रकारांना मार्गदर्शन करतांना महेश झगडे (उजवीकडे), तसेच अन्य मान्यवर

या प्रसंगी जिल्हा ग्राहक पंचायतीचे पालक भास्करराव मोहिते, टिळक विद्यापिठाचे विभागप्रमुख डॉ. हेमंत मोरे, ज्येष्ठ पत्रकार आणि सांगली अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष बापूसाहेब पुजारी, परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी उपस्थित होते.

दर्पणकार बाळाशास्त्री जांभेकर आणि लोकमान्य टिळक यांना नमन करतांना महेश झगडे (डावीकडे) आणि मान्यवर

महेश झगडे पुढे म्हणाले, ‘‘जगातील लोकशाहीची आरोग्य पडताळणी प्रत्येक वर्षी केली जाते. प्रसारमाध्यमांना स्वातंत्र्य नाही तिथे वेगाने लोकशाही ढासळत असल्याचे निरीक्षण आहे. त्यामुळे पत्रकारांचे दायित्व अधिक वाढत आहे. लोकशाहीचे ध्रुवीकरण थांबवायचे असेल, तर माध्यमांनी महत्त्वाचे प्रश्न प्रशासन, लोकप्रतिनिधी यांना विचारणे आवश्यक आहे. आक्रमकपणे बोलण्यापेक्षा कायद्याच्या तराजूत आक्रमकपणे प्रश्न मांडायला हवेत. त्यासाठी कायद्यातील तरतुदी, शासनाची परिपत्रके, प्रशासकीय नियम यांच्याविषयी माहिती घेतली पाहिजे. सध्या अधिकारी सांगतील तेवढीच माहिती आपण देतो.’’

सूत्रसंचालन कुलदीप देवकुळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष बलराज पवार, सरचिटणीस प्रवीण शिंदे, ‘पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती’चे अध्यक्ष गणेश कांबळे, महादेव केदार, विकास सूर्यवंशी, घनश्याम नवाथे, विनायक जाधव, नंदू गुरव, तानाजी जाधव, चंद्रकांत गायकवाड, शैलेश पेटकर, अक्रम शेख, अमोल पाटील, आदित्यराज घोरपडे, किशोर जाधव, किरण जाधव, प्रशांत साळुंखे आदींनी परिश्रम घेतले.