आगरा (उत्तरप्रदेश) येथे हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ‘सांता क्लॉज’चा पुतळा जाळला !

आगरा (उत्तरप्रदेश) – येथील सेंट जॉन्स महाविद्यालयाच्या बाहेर आणि शहरातील विविध शाळांच्या बाहेर राष्ट्रीय बजरंग दल अन् आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ‘सांता क्लॉज’चे पुतळे जाळले. ‘सांता क्लॉज’ याला ‘फादर ख्रिसमस’ किंवा ‘सेंट निकोलस’, असेही म्हटले जाते.

१. राष्ट्रीय बजरंग दलाचे क्षेत्रीय सरचिटणीस अज्जू चौहान यांनी आरोप केला की, डिसेंबर मासामध्ये ख्रिस्ती मिशनरी नाताळ, सांता क्लॉज आणि ख्रिस्ती नववर्ष यांच्या नावाखाली सक्रीय होतात. मुलांना सांता क्लॉजद्वारे भेटवस्तू देऊन त्यांना ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित करतात.

२. राष्ट्रीय बजरंग दलाचे कार्यकर्ते अवतार सिंह गिल यांनी म्हटले की, आम्ही अशा ख्रिस्ती मिशनर्‍यांवर लक्ष ठेवून आहोत, जे झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात.