शहरात आणखी ७ सहस्र सीसीटीव्ही लावण्यात येणार !
मुंबईसारख्या शहरातून सहस्रावधी मुली गायब होणे यावरूनच मुंबईच्या असुरक्षिततेची प्रचीती येते ! मुली गायब होऊ नयेत, यासाठी ठोस उपाययोजना करायला हवी ! – संपादक
मुंबई, २३ डिसेंबर (वार्ता.) – मुंबईतून प्रतिवर्षी शेकडो मुली गायब होत आहेत. वर्ष २०१९ मध्ये १ सहस्र ४८२, वर्ष २०२० मध्ये ८७९, तर वर्ष २०२१ मध्ये १ सहस्र १५८ मुली अशा मागील ३ वर्षांत एकूण ३ सहस्र ५१९ मुली गायब झाल्या आहेत. याविषयी विधानसभेच्या लक्षवेधी सूचनेच्या काळात शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी सूत्र उपस्थित केले. या मुलींचा शोध घेण्यासाठी मुंबईमध्ये आणखी ७ सहस्र सीसीटीव्ही कॅमेरे वाढवण्यात येणार आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सभागृहात दिली.
डॉ. मनीषा कायंदे यांनी २९ नोव्हेंबर २०२१ या दिवशी पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील ‘एम्.बी.बी.एस्.’ची विद्यार्थिनी गायब झाली असून अद्याप तिचा शोध लागला नसल्याचे सूत्र उपस्थित केले. याविषयी गृहराज्यमंत्री तनपुरे यांनी या प्रकरणाचा शोध बोईसर पोलीस ठाण्याकडून चालू असल्याचे सांगितले; मात्र याविषयी अद्याप शोध लागला नसल्यामुळे उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी हे प्रकरण ‘क्राईम ब्रांच’कडे सुपूर्द करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे सुपूर्द करत असल्याचे सतेज पाटील यांनी घोषित केले.
गायब झालेल्या ९७ टक्के मुलींचा शोध लागत आहे ! – सतेज पाटील, गृहराज्यमंत्री
मुंबईत सध्या ५ सहस्र ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ आहेत. आणखी ७ सहस्र सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. आतापर्यंत यांतील ३ सहस्र कॅमेरे लावण्यात आले आहेत. शासनाच्या ‘मुस्कान’ मोहिमेच्या अंतर्गत गायब झालेल्या मुलींचा राज्यभर एकाच दिवशी शोध घेतला जातो. यामध्ये महाविद्यालये आणि घरगुती कारणांमुळेही मुली गायब होत आहेत. या मोहिमेच्या अंतर्गत गायब होणार्या ९७ टक्के मुलींचा शोध लागत आहे.