मद्रास उच्च न्यायालयात ऑनलाईन सुनावणीच्या वेळी अधिवक्त्याचे महिलेसमवेत अश्‍लील चाळे !

न्यायालयाचा अवमान केल्याचा गुन्हा नोंदवण्याचा आदेश

न्यायालयाचा अशा प्रकारे अवमान करणार्‍या अधिवक्त्यांना न्यायालयाने कठोर दंड करावा, असेच जनतेला वाटते ! – संपादक

मद्रास उच्च न्यायालय

चेन्नई (तमिळनाडू) – मद्रास उच्च न्यायालयाने आर्.डी. संथन कृष्णन् या अधिवक्त्याच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. अधिवक्ता संथन हे ‘व्हिडिओ कॉन्फरसिंग’द्वारे चालू असलेल्या एका खटल्याच्या सुनावणीच्या वेळी एका महिलेसमवेत अश्‍लील चाळे करत असल्याच्या स्थितीत दिसून आले. त्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला. यामुळे न्यायालयाने हा गुन्हा नोंदवला आहे. तमिळनाडू आणि पुद्दुचेरी बार काउंसिलकडून या अधिवक्त्याला निलंबित करण्यात आले आहे.

न्यायालयाने म्हटले की, जेव्हा न्यायालयाच्या सुनावणीच्या वेळी अशा प्रकारचा निलाजरेपणा सार्वजनिक स्तरावर प्रसारित होत असेल, तेव्हा न्यायालय मूकदर्शक होऊ शकत नाही. त्यामुळे न्यायालयाने याची नोंद घेऊन गुन्हे अन्वेषण विभागाकडून अन्वेषण करण्याचा आदेश दिला आहे.

ऑनलाईन सुनावणीच्या वेळी अधिवक्त्यांकडून करण्यात आलेल्या काही अयोग्य कृती

न्यायालयाच्या ऑनलाईन सुनावणीच्या वेळी यापूर्वीही अधिवक्त्यांकडून काही अयोग्य कृती घडल्या आहेत. यात कर्नाटक उच्च न्यायालयाच्या एका ऑनलाईन सुनावणीच्या वेळी श्रीधर भट्ट नावाचे अधिवक्ते अर्धनग्न अवस्थेत उपस्थित होते. त्यांना याची जाणीव करून दिल्यानंतरही ते २० मिनिटे त्याच स्थितीत होते. राजस्थान उच्च न्यायालयाच्या एका सुनावणीच्या वेळी अधिवक्ता राजीव धवन हे हुक्का (तंबाखू सेवन करण्याचा एक प्रकार) ओढत असतांना दिसून आले होते. जून २०२१ मध्ये अधिवक्ता आणि काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी पँट न घालता सुनावणीला ऑनलाईन उपस्थित होते.