आयुर्वेद चिकित्सालये आणि संशोधन केंद्र असणारी रुग्णालये उभारणे ही काळाची आवश्यकता ! – डॉ. व्यंकट धर्माधिकारी, सहसंचालक, आयुष विभाग, पुणे

चिंचवड (पुणे) – आयुर्वेद हे शास्त्र व्यक्ती आजारी पडली, तर त्याला उपचार देणारे शास्त्र नसून कोणतीही व्यक्ती आजारी पडू नये, तसेच त्यांना अनुषंगिक असे कोणतेही आजार होऊ नयेत, याकरिता उपचार आणि मार्गदर्शन करणारे शास्त्र आहे. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे आपण आहार, विहार यांचे आचरण केले, तर मनुष्य सुदृढ, निरोगी असे दीर्घायुष्य जगू शकतो. उद्भवणार्‍या आजारांनुसार आहार कसा असावा ? त्याचे नियोजन कसे असावे ? याविषयी मार्गदर्शन चरक संहितेमध्ये केले आहे. हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर, हाडांचे विकार, पक्षाघात अशा आजारांवरसुद्धा आयुर्वेदाचा उपयोग होतो. ‘लोकमान्य हॉस्पिटल आयुर्वेद ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर’ सारखे सुसज्य हॉस्पिटल उभारणे ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पुणे आयुष विभागाचे सहसंचालक आणि ससून रुग्णालय आयुर्वेद विभागाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. व्यंकट धर्माधिकारी यांनी केले.

चिंचवड येथे लोकमान्य हॉस्पिटल आयुर्वेद ट्रीटमेंट आणि रिसर्च सेंटर या अत्याधुनिक हॉस्पिटलच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी संशोधन विभाग प्रमुख गायत्री गणू आणि अन्य पदाधिकारी तसेच डॉक्टर उपस्थित होते.

डॉ. धर्माधिकारी म्हणाले, ‘‘आयुर्वेद उपचार घेणार्‍या रुग्णांना विमापरतावा (मेडिक्लेम) मिळाला पाहिजे. सर्व शासकीय योजनांमध्ये आयुर्वेदाचा समावेश केला पाहिजे. कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात अनादिकाळापासून अस्तित्वात असणार्‍या आयुर्वेदाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आयुर्वेद सर्व जनसामान्य जनतेपर्यंत पोचवण्यासाठी डॉक्टरांसमवेत शासनाने सुद्धा योजना राबवणे आवश्यक आहे.’’

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नीलेश लोंढे यांनी, तर सूत्रसंचालन संजय रुईकर आणि आभार प्रदर्शन डॉ. श्याम सुंदर जगताप यांनी केले.