लस प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदी यांच्या छायाचित्राला विरोध करणारी याचिका केरळ उच्च न्यायालयाने फेटाळली

याचिकाकर्त्याला ठोठावला १ लाखाचा दंड !

थिरूवनंतपूरम् (केरळ) – भारतात कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर दिल्या जाणार्‍या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असते. या छायाचित्राविषयी आक्षेप घेणारी एक याचिका केरळ उच्च न्यायालयाने फेटाळत याचिकाकर्त्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ‘ही याचिका म्हणजे न्यायालयाचा वेळ वाया दवडण्याचा प्रकार असून ती राजकीय हेतूने प्रेरित आहे. ‘न्यायालयाचा वेळ वाया घालवणार्‍या अशा याचिका स्वीकारल्या जाणार नाहीत’, हा संदेश लोकांमध्ये आणि समाजामध्ये जावा, यासाठी १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. जर दिलेल्या मुदतीत हा दंड भरला गेला नाही, तर याचिकाकर्त्याच्या मालमत्तेच्या जप्तीमधून तो वसूल करावा’, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

याचिकाकर्ते पीटर म्यालिपरम्पिर यांनी पंतप्रधानांच्या छायाचित्राविनाच लस प्रमाणपत्र देण्याची मागणी केंद्राकडे केली होती; पण त्यांना सरकारने कोणताही प्रतिसाद दिला नव्हता. ‘लशीच्या दोन्ही मात्रांसाठी मी पैसे दिले आहेत. त्यामुळे लस प्रमाणपत्र ही माझी वैयक्तिक गोष्ट आहे. त्यावर माझी वैयक्तिक माहिती आहे. त्यामुळे या खासगी गोष्टीमध्ये कोणतेही अतिक्रमण होणे योग्य नाही’, असे पीटर यांचे म्हणणे होते.