‘सनातन संस्थेचे ग्रंथ हे कलियुगातील पाचवा वेद आहेत. या ग्रंथांमध्ये पृथ्वीवर कुठेही उपलब्ध नसलेले ईश्वरी ज्ञान आहे. त्यामुळे सनातनची ग्रंथसंपदा अनमोल आहे. यांतील काही ग्रंथांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. आध्यात्मिक काव्यसंग्रह
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वडिलांनी प.पू. बाळाजी आठवले यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, नातेवाईक, मित्र, कुटुंबीय इत्यादींवर केलेल्या कवितांचा काव्यसंग्रह आहे.
२. ‘साधकांनो, तुम्ही जिंकलात, मी हरलो’, या ग्रंथाचे आध्यात्मिक महत्त्व
या ग्रंथात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘साधकांनो, तुम्ही जिंकलात, मी हरलो’, ही कविता केलेली आहे. ही कविता वाचून सनातनचे साधक आणि संत यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुणगान करण्यासाठी कवितारूपी उत्तरे या ग्रंथात लिहिलेली आहेत. अशा प्रकारे परात्पर गुरुदेव आणि संत अन् साधक यांनी काव्यातून एकमेकांशी जणू संभाषणच साधले आहे. भगवंताला जगातील कुणीही हरवू शकत नाही. भगवंत केवळ त्याच्या भक्तापुढे हरतो आणि भक्ताच्या इच्छेने वागतो. विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांना साधकरूपी भक्तांनी त्यांच्या भक्तीभावाने जिंकले आहे. समाजातील व्यक्तींना साधकांच्या भक्तीचे महत्त्व कळावे आणि भक्ताच्या भक्तीपुढे भगवंत कसा हरतो’, याची आध्यात्मिक इतिहासात नोंद व्हावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘साधकांनो, तुम्ही जिंकलात, मी हरलो !’, ही कविता लिहिली आहे.
३. ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ या ग्रंथाचे आध्यात्मिक महत्त्व
अन्य युगांमध्ये भक्तीयोग, ज्ञानयोग, कर्मयोग, ध्यानयोग, हठयोग इत्यादी योग होते. सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांमध्ये मनुष्याचे आयुष्य सहस्रो वर्षांचे होते. त्यामुळे या योगमार्गांनुसार अनेक साधक आणि ऋषिमुनी यांनी सहस्रो वर्षे साधना करून ईश्वरप्राप्ती केली. कलियुगात मनुष्याचे आयुष्य १०० वर्षांपेक्षा अल्प आहे. या अल्पायुष्यात शीघ्र गतीने आध्यात्मिक उन्नती करून मोक्षप्राप्ती करण्यासाठी श्रीगुरूंची कृपा होणे अत्यावशक आहे. जिज्ञासू, मुमुक्षु आणि साधक यांनी लवकरात लवकर शिष्यपद प्राप्त करून श्रीगुरूंची कृपा संपादण्यासाठी गुरुकृपायोगानुसार साधना करणे आवश्यक होते. यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘गुरुकृपायोग’ या नवीन योगाची निर्मिती केली. या योगमार्गानुसार साधना केल्याने सहस्रो साधकांनी ६१ टक्क्यांपेक्षा अधिक आध्यात्मिक पातळी गाठून ते जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाले आहेत आणि शंभराहून अधिक साधकांनी संतपद प्राप्त केलेले आहे. या योगमार्गानुसार भविष्यात अनेक जिज्ञासू, मुमुक्षु आणि साधक यांना गुरुकृपायोगानुसार साधना करता यावी, यासाठी या साधनेचे महत्त्व ‘गुरुकृपायोगानुसार साधना’, या ग्रंथात विषद केला आहे.
४. कर्मयोग
सर्व प्रकारच्या जिवांसाठी ‘पृथ्वी’ ही कर्मभूमी आहे. पृथ्वीवरील कोणताही जीव कर्म केल्याविना राहू शकत नाही. कर्मबंधनात अडकलेल्या जिवाने कोणते कर्म केले असता, तो जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सुटून मुक्ती आणि मोक्ष प्राप्त करू शकतो ? याची सविस्तर माहिती सनातन-निर्मित ‘कर्मयोग’ या ग्रंथात दिली आहे. कर्मयोगानुसार साधना करतांना कर्तेपणा देवाच्या चरणी अर्पण कसा करावा आणि अपेक्षाविरहित कर्म कसे करावे ? यांविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. या ग्रंथात ‘सकाम कर्मातून हळूहळू निष्काम कर्माकडे कसे जायचे ?’, याचे आध्यात्मिक परिभाषेत सुंदर विवेचन केले आहे. हा ग्रंथ वाचून कर्ममार्गी जिज्ञासू, मुमुक्षु आणि साधक हे कर्मयोगानुसार त्यांच्या पातळीनुसार साधना करून ते साधनेत प्रगती करू शकतात. हा ग्रंथ सर्वच कर्मयोगींना आध्यात्मिक उन्नतीसाठी मार्गदर्शक आहे.
५. नामसंकीर्तनयोग
या ग्रंथामध्ये ‘विविध प्रकारचे देवतांचे नामजप, विविध वाणीतील नामजप आणि भगवंताचे नाम घेत साधना कशी करायची ?’, याचे सविस्तर विवरण विविध प्रकारची तात्त्विक माहिती अन् सारणी यांच्या माध्यमांतून या ग्रंथात केले आहे. या ग्रंथामध्ये नामजप आणि मंत्रजप यांतील आध्यात्मिक स्तरावरील भेदही अत्यंत चांगल्या प्रकारे दिलेला आहे.‘दशापराधविरहित’ नामजप कसा करावा ?, तसेच नामजप केल्यामुळे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक या स्तरांवर कशा प्रकारे लाभ होतो’, याचे सुंदर विश्लेषण या ग्रंथात केले आहे. त्यामुळे नामजपावरील श्रद्धा आणि भक्तीभाव वाढण्यास साहाय्य होते.
६. भावजागृतीसाठी साधना
भक्तीयोग आणि गुरुकृपायोगातील अष्टांग योगांच्या अंतर्गत आठवे अंग ‘भावजागृती’ हे आहे. ‘भावजागृतीसाठी साधना’ या ग्रंथामध्ये भावाचे प्रकार आणि भावजागृतीसाठी करायचे प्रयत्न यांच्या तात्त्विक माहितीसह भावजागृतीचे प्रयत्न केल्यावर आध्यात्मिक स्तरावर आलेल्या अनुभूती यांचाही समावेश केलेला आहे. या ग्रंथाच्या मुखपृष्ठावर भावावस्थेचे मूर्तीमंत रूप असणारे ‘श्री रामकृष्ण परमहंस’ यांचे भावावस्थेतील चित्र आहे. त्याचप्रमाणे या ग्रंथाचे लिखाणही अत्यंत भावपूर्णरित्या केले आहे. त्यामुळे या ग्रंथामध्ये वाल्मीकि ऋषींनी लिहिलेल्या ‘रामायण’ या ग्रंथाइतकी सात्त्विकता निर्माण झालेली आहे. त्यामुळे हा ग्रंथ केवळ पाहिल्याने किंवा तो हातात धरल्यामुळे भाव जागृत होतो आणि यावरून ग्रंथाच्या ‘भावजागृतीसाठी साधना’ या नावाचे खर्या अर्थाने सार्थक झाल्याची प्रचीती येते.’
– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.११.२०२१)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |