पुणे येथील दरोडा आणि हत्याप्रकरणी २४ वर्षांनी आरोपीस फाशीची शिक्षा !

विलंबाने मिळालेला न्याय हा अन्याय नव्हे का ? – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – कल्याणीनगरमधील ‘पिस्ट्रन टाऊन’च्या सदनिकेमध्ये १५ ते १६ मे १९९७ या दिवशी दरोडा टाकून २ सख्ख्या बहिणी आणि त्यांच्या आई-वडील यांची हत्या करण्यात आली. या घटनेतील मुख्य आरोपी भागवत काळे याला २४ वर्षांनंतर सत्र न्यायाधीश बी.पी. क्षीरसागर यांनी फाशीची शिक्षा सुनावली. या दरोड्यात सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, असा ४६ लाख ९० सहस्र रुपयांचा ऐवज चोरला होता. पोलिसांनी तो शासनाधीन केला आहे.

खटला चालू असतांना काळे आणि त्याच्या साथीदाराला येरवडा कारागृहात नेत असतांना त्यांनी पोलीस ‘व्हॅन’ मधून पळ काढला. (पोलीस व्हॅनमधून पळून जाऊ देणार्‍या पोलिसांवर कठोर कारवाई झाली का ? असे पोलीस पोलीस विभागात अडचणच आहेत, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? – संपादक) काळे हा १२ वर्षे फरार होता. त्याला पुन्हा अटक करण्यात आली. खटला चालू असतांना अनेक साक्षीदार, अन्वेषण अधिकारी, पंच अशा एकूण २० जणांचे निधन झाले. वर्ष २००४ मध्ये न्यायालयाने संबंधित महिला गरोदर असल्याने तिला जन्मठेप, तर त्याच्या साथीदाराला फाशीची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयानेही ही शिक्षा कायम ठेवली.