धर्मादाय रुग्णालयांच्या मुख्य फलकावर ‘धर्मादाय’ असा उल्लेख करण्यात यावा आणि गरीब अन् गरजू रुग्णांसाठीच्या योजनांचे फलक दर्शनी भागात लावण्यात यावेत !
आरोग्य साहाय्य समितीचे धर्मादाय उपायुक्तांना निवेदन
कोल्हापूर, १६ डिसेंबर (वार्ता.) – धर्मादाय आयुक्तांनी राज्यातील धर्मादाय रुग्णालयांनी त्यांच्या नावामध्ये अथवा नावासमोर ‘धर्मादाय अथवा चॅरिटेबल’ हा शब्द नमूद करण्यास, तसेच तो प्रसिद्ध करण्यासाठी आदेश दिले आहेत. याविषयी कोल्हापूर जिल्ह्यातील काही धर्मादाय रुग्णालयांना प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी केली असता, काही रुग्णालयांकडून वरील आदेशानुसार कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. तरी धर्मादाय रुग्णालयांच्या मुख्य फलकावर ‘धर्मादाय’ असा उल्लेख करण्यात यावा आणि गरीब अन् गरजू रुग्णांसाठीच्या योजनांचे फलक दर्शनी भागात लावण्यात यावेत, या मागणीचे निवेदन आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने १४ डिसेंबर या दिवशी धर्मादाय उपायुक्त प्रदीप चौधरी यांना देण्यात आले. निवेदन स्वीकारल्यानंतर धर्मादाय उपायुक्तांनी १५ दिवसांत याची पडताळणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
या वेळी शिवसेना करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री बाबासाहेब भोपळे, शिवानंद स्वामी, दीपक कातवरे आणि अजिंक्य पाटील उपस्थित होते.
धर्मादाय उपायुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
१. पहाणीच्या वेळी ‘मसाई हॉस्पिटल’ हे रुग्णालय आणि जिल्ह्यातील काही धर्मादाय रुग्णालये यांनी गरीब अन् गरजू रुग्णांसाठी शासनाकडून वेळोवेळी लागू केलेल्या विविध योजनांची माहिती देणारे (धर्मादाय रुग्णालयात गरीब रुग्णांसाठी आरक्षित असलेल्या खाटांची संख्या, सवलतीच्या दरात मिळणार्या आरोग्य सुविधा इत्यादी) प्रसिद्धी फलक लावले नसल्याचे निदर्शनास आले आहे.
२. जिल्ह्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांच्या नावामध्ये अथवा नावासमोर ‘धर्मादाय अथवा चॅरिटेबल’ असा उल्लेख करण्याविषयीची पूर्तता त्वरित व्हावी आणि त्याची पूर्तता झाल्याचा अहवाल आपल्या कार्यालयाकडे सादर करण्यासाठी ‘बाँबे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट’च्या कलम ४१ ‘अ’ आणि ४१ ‘ड’ खाली आदेश देण्यात यावेत.
३. सदर रुग्णालय हे धर्मादाय रुग्णालय असून शासनाकडून वेळोवेळी घोषित केलेल्या आरोग्य योजना त्या रुग्णालयात सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत, याची प्रसिद्धी करण्याचेही आदेश आपल्या कार्यालयाकडून निर्गमित करण्यात यावेत. यामुळे सर्वसामान्यांना या योजनांचा लाभ मिळेल.