डॉ. कोल्हे यांचे सोयीस्कर छत्रपतीप्रेम !

संपादकीय

राष्ट्रपुरुषांनाही जात्यंध दृष्टीने पाहून त्यांचे उत्तुंग कार्य नाकारणारे ब्राह्मणद्वेषी लोकप्रतिनिधी !

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला. पुणे विमानतळात पेशव्यांच्या पराक्रमाची चित्रे पाहून ‘येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचीही चित्रे असायला हवीत’, असे मत कोल्हे यांनी बोलून दाखवले. प्रत्येक मराठी माणसाला आणि हिंदु असल्याचा अभिमान असलेल्या प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आत्मियता आहे. ‘अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारी चित्रे पुणे विमानतळाच्या परिसरात असायला हवीत’, या डॉ. कोल्हे यांच्या मागणीत काहीच चुकीचे नाही; मात्र अशी मागणी करण्यामागे ‘शिवप्रेम किती आणि जातीयवादाचे राजकारण किती ?’, हा मात्र अभ्यासाचा विषय आहे.

छुपा ब्राह्मणद्वेष !

डॉ. कोल्हे यांनी कितीही गप्पा मारल्या, तरी त्यांचा जातीयवाद त्यांच्या बोलण्यातून लपून रहात नाही. डॉ. कोल्हे यांच्या मनात जातीयवाद नसता, तर त्यांनी तेथील व्यवस्थापनाला भेटून त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या चित्रांचाही समावेश करण्याची विंनती केली असती; मात्र तसे काही न करता डॉ. कोल्हे यांनी थेट सामाजिक माध्यमांचा आधार घेऊन विषय मांडल्याने त्याला जातीयवादाचा दर्प येतो. ‘पुणे येथे केवळ शनिवारवाडा नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’चा लाल महालसुद्धा आहे. सिंहगडही आहे आणि याच जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी, तसेच छत्रपती संभाजी महाराज यांचे बलीदानस्थळ वढू तुळापूरही आहे. याचा पुणे विमानतळाला विसर पडला कि काय ?’, असा प्रश्न कोल्हे यांनी उपस्थित केला. यामध्ये पेशव्यांच्या पराक्रमाविषयी आदर असल्याची वल्गना डॉ. कोल्हे यांनी केली असली, तरी त्यातून छुपा ब्राह्मणद्वेष दिसून येतो. विमानतळावर जर छत्रपती शिवरायांची चित्रे असती आणि पेशव्यांची चित्रे नसती, तर पेशव्यांच्या चित्रासाठी डॉ. कोल्हे यांनी अशी पोस्ट प्रसारित केली असती का ? वाहिन्यांवर छत्रपतींची भूमिका साकारूनही ज्यांनी महाराजांना ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ ही उपाधी लावण्याचे औदार्य दाखवले नाही, असासोयीनुसार इतिहास दाखवणार्‍या व्यक्तीकडून अशी अपेक्षाही करता येणार नाही. डॉ. अमोल कोल्हे यांचा कल शिवरायांविषयीच्या अभिमानापेक्षा जातीयवादाकडे आणि त्याहून अधिक ब्राह्मणद्वेषाकडे झुकणारा आहे.

डॉ. कोल्हे यांचा हा जातीयवाद काही नवा नाही. पुणे येथील विमानतळावर पेशव्यांची चित्रे पाहून जर डॉ. कोल्हे यांना छत्रपतींची आठवण होते, तर प्रतापगडाच्या पायथ्याची स्वराज्यावर आक्रमण करणार्‍या अफझलखानाच्या कबरीचे सध्या जे उदात्तीकरण चालू आहे, त्याविषयी त्यांचे रक्त का सळसळत नाही ? त्याचे एखादे छायाचित्र सामाजिक माध्यमांवर प्रसारित करून डॉ. कोल्हे आवाज का उठवत नाहीत ? अफझलखान ब्राह्मण नाही, मुसलमान आहे म्हणून कोल्हे गप्प आहेत का ? ‘अशी पोस्ट पाठवल्यास शरद पवार पुन्हा निवडणुकीचे तिकीट देतील कि नाही ?’ याविषयी डॉ. कोल्हे यांना भीती वाटते का ? डॉ. कोल्हे यांच्या राष्ट्रवादाविषयी आम्हाला आक्षेप घ्यायचा नाही; मात्र तो जेव्हा जातीयवादातून सोयीनुसार वापरला जातो, तेव्हा वस्तूस्थिती मांडणे आवश्यक ठरते. डॉ. कोल्हे यांचा राष्ट्रवादही असाच जातीयवादावर आधारित आहे, हा आक्षेपाचा विषय आहे. ‘पेशव्यांच्या चित्रासमवेत छत्रपती शिवरायांचे चित्र लावा’, असे ‘ट्वीट’ करायचे आणि महाराष्ट्रात अफझलखानाचा कोथळा काढणार्‍या छत्रपती शिवरायांच्या चित्रावर अघोषित बंदी घालण्यात आली, तेव्हा शेपूट घालायचे, असे बेगडी शिवप्रेम महाराष्ट्राला मान्य नाही. म्हणजे ब्राह्मण म्हटले की चोपायचे आणि मुसलमान म्हटले की थोपटायचे, हाच डॉ. कोल्हे यांचा जातीयवाद होय.

जात्यंधतेतून राष्ट्रवाद डावलणे, राष्ट्रासाठी घातक !

 

डॉ. कोल्हे यांच्या जातीयवादाची अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज या मालिकांतून डॉ. कोल्हे महाराष्ट्रातील घराघरांत पोचले. या मालिका काढण्यासाठी डॉ. कोल्हे यांनी घेतलेले कष्ट आणि चिकाटी ही निश्चितच कौतुकास्पद आहे; मात्र केवळ ब्राह्मण आहेत, म्हणून या मालिकांतून समर्थ रामदासस्वामी, दादोजी कोंडदेव यांचे यथोचित स्थान डावलण्यात आले. ज्यांनी स्वराज्याशी गद्दारी केली, राष्ट्रद्रोह केला, ते ब्राह्मण असोत, वा अन्य कोणत्याही जातीचे असोत त्यांचा समाचार घ्यायलाच हवा; परंतु ज्यांनी राष्ट्रासाठी सर्वस्वाचे बलीदान दिले, राष्ट्र उभारणीचे कार्य केले, त्यांचा गौरव करण्यात जातीयवाद आलाच कुठे ? मात्र डॉ. कोल्हे यांचा हा थिटेपणा वेळोवेळी दिसून आला. मराठ्यांनंतर पेशव्यांनी हिंदवी स्वराज्य अटकेपार नेले, हा इतिहास नाकारता येणार नाही. केवळ ब्राह्मण म्हणून तो डावलणे, हे जातीयवादाचे लक्षण आहे. राष्ट्रवाद पेशव्यांचा असो, डॉ. बाबासाहेबांचा असो, वा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा असो, मतभेदांना ओलांडून त्याचा गौरव व्हायला हवा. ‘ब्राह्मणांनी दलितांवर अन्याय केला’, असे म्हणून समस्त ब्राह्मणजातीला पाण्यात पहाणे आणि ब्राह्मण राष्ट्रधुरिणांविषयी शंका उपस्थित करणे, हा राष्ट्रवादाचा अपमान आहे. ब्राह्मणांनी दलितांवर अत्याचार केल्याचे दाखले देऊन ब्राह्मणांच्या राष्ट्रकार्याविषयी शंका घ्यायची झाली, तर स्वराज्यावर आक्रमण करणारे, तुळजापूर, सोमनाथ आदी लाखो मंदिरे उद्ध्वस्त करणारे धर्मांध आक्रमकांचे वंशज आज या देशात अल्पसंख्य असल्याचा कांगावा करून सवलती लाटतात, त्यांच्याशी भारतियांनी कसे वागावे ? याचे उत्तर समस्त जातीयवादी आणि पुरोगामी मंडळींनी द्यावे ? कुणाची जात पाहून त्यांच्या राष्ट्रवादाला डावलणे, हे देशाच्या एकात्मतेला घातक आहे !