मुंबई – अँटिलिया बंगल्याजवळ स्फोटके ठेवल्याचे प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या या प्रकरणांतील आरोपी क्रिकेट बुकी नरेश गौर यांची सुटका करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्र्रीय अन्वेषण विभागाला ८ डिसेंबर २०२१ या दिवशी दिले आहेत.
राष्ट्र्रीय अन्वेषण विभागाने नरेश गौर यांना वरील प्रकरणात अटक केल्यानंतर जामिनासाठी त्यांनी विशेष न्यायालयात धाव घेतली. या न्यायालयाने त्यांना जामीन दिल्यावर विभागाने आक्षेप घेतला. त्यावर विशेष न्यायालयाने हा निर्णय स्थगित केला होता. या स्थगिती निर्णयाला गौर यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू जाणून घेतल्यानंतर गौर यांच्या बाजूने निर्णय दिला. गुणवत्तेच्या आधारावर दिलेल्या जामिनाला स्थगिती देण्याची आवश्यकता काय ?, असा प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला आहे.