हिंदी महासागरातील चीनच्या युद्धनौकांवर नौदलाचे लक्ष ! – नौदलप्रमुख आर्. हरिकुमार

नवी देहली – लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चिनी सैन्यासमवेतच्या संघर्ष आणि तणाव यांच्या घटनांनंतर हिंदी महासागरात भारताचे नौदल सतर्क आहे. चीनच्या प्रत्येक नौकेवर लक्ष ठेवले जात आहे, अशी माहिती भारताचे नवनियुक्त नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल आर्. हरिकुमार यांनी दिली. ते ४ डिसेंबरला ‘नौदल दिना’च्या निमित्ताने पत्रकारांशी बोलत होते.
अ‍ॅडमिरल हरिकुमार पुढे म्हणाले की, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव होता, तेव्हा आपण हिंदी महासागर क्षेत्रात युद्धनौका तैनात केली होती. परिस्थिती बिघडताच चीनला योग्य उत्तर देता यावे, हा त्यामागील उद्देश होता. चीन वर्ष २००८ पासून हिंदी महासागर क्षेत्रात कुरापती काढत आहे. हिंदी महासागरात पूर्वी चीनच्या ८ युद्धनौका असायच्या, आता ३ आहेत. आम्ही त्यांवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत.

युद्धनौकांवर महिला अधिकार्‍यांची नियुक्ती

अ‍ॅडमिरल हरिकुमार पुढे म्हणाले, नौदलाच्या प्रमुख युद्धनौकांवर महिला अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १५ प्रमुख युद्धनौकांवर आतापर्यंत अनुमाने २८ महिला अधिकार्‍यांना नियुक्त करण्यात आले आहे. लवकरच ही संख्या वाढणार आहे. या दलात विविध भूमिकांमध्ये महिलांना सहभागी करून घेणे आणि त्यांच्यावर दायित्व सोपवणे, यांसाठी नौदल सिद्ध आहे. ‘राष्ट्रीय संरक्षण अकादमी’मध्ये महिलांना प्रशिक्षण देण्याच्या पद्धतीवर काम केले जात आहे.