पू. (सौ.) संगीता जाधव यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांना भावप्रयोग करतांना आलेली अनुभूती

१. अन्य पंथियांकडून ‘गुरुभक्ती, गुरूंप्रतीचा भाव आणि गुरूंसाठी सर्व सुखांचा त्याग करण्याची सिद्धता’ हे गुण शिकूया !

पू. (सौ.) संगीता जाधव

१ अ. अन्य पंथियांच्या मंदिरातून ऐकू येणारी गाणी चित्रपटाच्या संगीतावर आधारित असल्यामुळे साधिकेला ऐकायला कंटाळा येत असल्याचे सांगणे : ‘पू. (सौ.) संगीता जाधवकाकू प्रसार सेवेनिमित्त बाहेर असतात. त्या दिवाळीनंतर घरी आल्यामुळे आम्ही उभयता त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. त्यांच्याशी बोलत असतांना मध्येच शेजारी असलेल्या अन्य पंथियांच्या मंदिरातून ध्वनीवर्धकावरून मंदिरात चालू असलेल्या कार्यक्रमाचा मोठ्याने आवाज येत होता. तेव्हा मी काकूंना म्हणाले, ‘‘गेल्या ८ – १० दिवसांपासून हा आवाज ऐकू येतो. या आवाजामुळे आम्ही वैतागलो आहोत. या कार्यक्रमाच्या गाण्यातून त्यांच्यातील गुरुभक्तीविषयीचे वर्णन असते; परंतु ती गाणी चित्रपटातील गाण्यांच्या चालीवर आधारित असल्यामुळे मला ऐकायला कंटाळा येतो.’’ त्यावर पू. काकूंनी मला पुढील दृष्टीकोन दिला.

१ आ. अन्य पंथियांकडून तळमळ आणि त्यांची गुरूंवरील भक्ती शिकायला हवी !  : तेव्हा पू. काकूंनी सांगितले, ‘‘अहो, ‘आपल्याला ती गाणी सिनेमाच्या गाण्यांच्या चालीवर आहेत’, असे वाटते; परंतु ते त्यातून त्यांच्या गुरुदेवांच्या चरणी भाव व्यक्त करतात. त्यांच्याकडून हे आपण शिकायला पाहिजे. त्या लोकांमध्ये त्यांच्या गुरूंविषयी उत्कट भाव असतो. त्यांच्या गुरूंचे मार्गदर्शन असेल, तेव्हा त्यांच्या भक्तांना काही कामानिमित्त जाता येत नसेल, तर ते आळीपाळीने दर्शन घ्यायला जातात. कितीही व्यस्त असो, तरी त्यांचे भक्त त्यांच्या गुरूंचे दर्शन घेतल्याविना रहात नाहीत. केवळ गाण्यांच्या चालीमुळे आपण त्यातील अर्थ समजून न घेता, ‘ऐकायचा कंटाळा येतो’, असे म्हणणे चुकीचे आहे. आपल्याला गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) भजने चित्रपटाच्या गाण्यांच्या चालींवर न म्हणता योग्य चालींमध्ये भावपूर्ण म्हणायला शिकवल्यामुळे आपल्याला तसे वाटते. त्यांच्या गाण्यांमधून सात्त्विकता मिळत नसेल; परंतु आपल्याला त्याचा त्रासही होऊ नये. त्यांची तळमळ, गुरूंवरील भक्ती हा भाग आपण शिकूया’’, असा सकारात्मक दृष्टीकोन दिला.

१ इ. अन्य पंथीय त्यांच्या गुरूंसाठी सर्वस्वाचा त्याग करत असणे : पुढे त्या म्हणाल्या, ‘‘अन्य पंथीय लोकांमध्ये गुरूंविषयी इतका भाव असतो की, ते गुरूंसाठी सर्वस्वाचा त्यागही करतात. काही जण क्षमता नसतांनाही धनाचा त्याग करतात, तसेच त्यांची गुरुचरणांजवळ जाण्याची आणि लहान वयातच सर्व सुखांचा त्याग करून जाण्याची सिद्धता असते. ‘या सर्व गोष्टी आपण करू शकतो का ?’, असा विचार करूया.’’

पू. काकूंचे दृष्टीकोन ऐकून ‘आम्ही समाजातील लोकांकडे केवळ बाह्यांगानेच पहातो’, असे मला वाटले. परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला पू. जाधवकाकूंच्या माध्यमातून अयोग्य विचारांतून बाहेर काढून मला माझी चूक लक्षात आणून दिली. यासाठी श्री गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञ आहे.

२. पू. (सौ.) संगीता जाधव यांनी एका साधिकेला कृतज्ञताभावाविषयी सांगितलेली सूत्रे

सौ. सुजाता रेणके

एक साधिका काकूंना म्हणाल्या, ‘‘माझ्यात गुरुदेवांविषयी कृतज्ञताभावच नाही किंवा माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त होत नाही.’’ तेव्हा पू. काकूंनी पुढील सूत्रे सांगितली.

अ. तुमच्यामध्ये कृतज्ञताभाव आहे; म्हणूनच गुरुदेवांनी तुम्हाला येथे बोलावून घेतले आहे. तुम्ही सर्व साधक आश्रमात आणि आश्रमाजवळ रहात असल्यामुळे नेहमी त्यांच्या वलयामध्येच आहात. तुम्ही भाग्यवान आहात. आपण सर्व जणच भाग्यवान आहोत.

आ. आपले प्रारब्ध आणि सुख-दुःखात अडकणे यांमुळे गुरुदेवांना आपण अनुभवू शकत नाही; परंतु आपल्याला इतके महान गुरु भेटले आहेत की, ते आपली सर्व दुःखे दूर करून आपल्याकडून साधना करवून घेत आहेत आणि आपल्याला सतत आनंद देत आहेत; म्हणून सतत सकारात्मक विचार करून आपल्याला गुरुदेवांची प्रीती अनुभवता आली पाहिजे.

‘हे गुरुदेवा, पू. (सौ.) संगीता जाधवकाकूंकडून ‘गुरुदेवांविषयी उत्कट भाव कसा ठेवायचा ?’, हे शिकायला मिळाले. यासाठी परात्पर गुरु डॉक्टर आणि पू. (सौ.) संगीता जाधवकाकू यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. सुजाता अशोक रेणके, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.११.२०२१)

‘गुरुदेवांच्या अंगठ्याच्या नखाच्या पोकळीत जाणे’, हा भावप्रयोग करतांना पू. (सौ.) संगीता जाधवकाकूंना आलेली अनुभूती

पू. काकू देवद आश्रमात असतांना सूक्ष्मातून गुरुदेवांच्या एका अंगठ्याच्या नखाच्या पोकळीत जाण्याचा भावप्रयोग करत असत. तेव्हा ‘गुरुदेवांच्या नखाच्या पोकळीत कितीतरी ब्रह्मांडे सामावलेली आहेत. त्या नखाच्या पोकळीतून सर्वत्र पांढरा प्रकाश पडत आहे. त्यात सर्व साधक अगदी आनंदाने त्यांच्या छत्रछायेखाली बसले आहेत’, असे त्यांना जाणवले. नंतर त्या त्यांच्या गोव्यातील घरी आल्यावर सकाळी उठल्यानंतर भावस्थिती अनुभवू लागल्या. तेव्हा त्यांना परात्पर गुरु डॉक्टरांची खोली, गुरुदेव, असे काहीच दिसत नव्हते. केवळ त्यांच्या अंगठ्याचे नखच दिसू लागले. त्या ‘माझे गुरुदेव कुठे आहेत ?’ त्यांची खोली कुठे आहे ?’, असे शोधत असतांना ‘त्या गुरुदेवांच्या चरणांखाली आहेत’, असे दिसले. ‘त्यांना गुरुदेव दिसत नसून केवळ त्यांचे नखच दिसत आहे आणि त्या नखाच्या पोकळीत अनेक ब्रह्मांडे दिसत आहेत’, असे जाणवले. अशी अनुभूती सांगून त्या म्हणाल्या, ‘‘या सर्वव्यापी गुरुदेवांचा संपूर्ण देह आपण कसा पाहू शकणार ?’’ हे ऐकून आमची पुष्कळ भावजागृती झाली.

– सौ. सुजाता अशोक रेणके, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.११.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक