श्रीकृष्णजन्मभूमीवर होणारा ६ डिसेंबरचा भगवान श्रीकृष्णाचा जलाभिषेक रहित ! – हिंदु महासभा

मथुरेमध्ये कलम १४४ लागू करून हिंदु महासभेच्या पदाधिकार्‍यांना घरातच नजरकैदेत ठेवल्याचा परिणाम

  • मुसलमान आक्रमकांच्या काळात अनेक मंदिरे पाडून तेथे मशिदी बांधण्यात आल्या. ही जागा परत मिळण्यासाठी हिंदू वैध मार्गाने प्रयत्न करत आहेत. यासाठी हिंदू न्यायालयीन लढाही देत आहेत. वास्तविक ‘हिंदूबहुल भारतात हिंदूंवर असा लढा देण्याची वेळ का येते ?’, हा कळीचा प्रश्‍न आहे. त्याचे उत्तर शासनकर्त्यांनी द्यावे ! – संपादक
  • कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण सांगून हिंदुत्वनिष्ठांना नजरकैदेत ठेवणे, ही एकप्रकारे मुस्कटदाबीच होय ! हिंदूंना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी उत्तरप्रदेशमधील भाजप सरकारने प्रयत्न करणे हिंदूंना अपेक्षित आहे ! – संपादक
श्रीकृष्णजन्मभूमी

मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीमध्ये ६ डिसेंबर या दिवशी जलाभिषेक करण्याची घोषणा हिंदु महासभेने केली होती. त्यामुळे प्रशासनाकडून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्यात आले. तसेच हिंदु महासभेच्या पदाधिकार्‍यांना घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. यामुळे जलाभिषेकाचा कार्यक्रम रहित करण्यात येत आहे, असे हिंदु महासभेने घोषित केले आहे. असे असले, तरी पोलिसांकडून सतर्कता म्हणून सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे. औरंगजेबाच्या काळात श्रीकृष्णजन्मभूमीवरील मंदिर पाडून तेथे इदगाह मशीद बांधण्यात आली. ती भूमी परत मिळावी, यासाठी न्यायालयात खटला चालू आहे. या मशिदीत जाऊन तेथे श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून जलाभिषेक करण्याचे हिंदुत्वनिष्ठांचे नियोजन होते.

१. जलाभिषेक कार्यक्रमासाठी हिंदु महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पणती राजश्री चौधरी येणार होत्या. त्यांनीच या कार्यक्रमाची घोषणा केली होती; मात्र प्रशासनातील अधिकार्‍यांकडून त्यांची समजूत घालण्यात आली असून त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्तावित कार्यक्रम रहित केला आहे. याविषयी हिंदु महासभेकडून अधिकृत माहितीही देण्यात आली आहे.

२. मथुरेतील तणावाच्या स्थितीवरून अखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश पाठक यांनी म्हटले आहे की, काही लोक मथुरेतील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी मथुरेतील सामान्य जनतेने शांतता भंग होऊ नये; म्हणून दक्ष रहायला हवे आणि जिल्हा प्रशासनाला सहकार्य करायला हवे.

३. दुसरीकडे श्रीकृष्णजन्मभूमी विवाद खटला मथुरेच्या स्थानिक न्यायालयात चालू आहे. हिंदु महासभा यात पक्षकार आहे. या खटल्याची पुढील सुनावणी १५ फेब्रुवारीला होणार आहे. श्रीकृष्णजन्मभूमीची १३.३३ एकर भूमी अखिल भारतीय हिंदु महासभेचे माजी अध्यक्ष पंडित मदनमोहन मालवीय यांनी खरेदी केली होती.