जुने गोवे वारसास्थळाजवळील बांधकाम प्रकल्पाची अनुमती मागे घेण्याचे आदेश दिले आहेत ! – बाबू कवळेकर, उपमुख्यमंत्री

याचप्रमाणे सांकवाळ येथील वारसास्थळाजवळील ख्रिस्त्यांच्या अवैध बांधकामावरही शासन कारवाई करेल का ?

पणजी, २६ नोव्हेंबर (वार्ता.) – जुने गोवे वारसास्थळातील बंगल्याच्या बांधकामाची अनुमती मागे घेण्याचे आदेश शासकीय अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती शहर आणि नगरनियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी दिली आहे.

जुने गोवे येथील सेंट कॅजिटन चर्च या वारसास्थळाजवळ भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरील प्रवक्त्या शायना एन्.सी. यांच्या बंगल्याचे बांधकाम चालू असल्याचा आरोप आहे. ‘जुने गोवे येथील वारसाक्षेत्रातील वादग्रस्त बांधकामाविषयी मुख्यमंत्र्यांनी येत्या ४८ घंट्यांत निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलनाला तोंड देण्याची सिद्धता ठेवावी’, अशी चेतावणी भाजप शासनातील कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो यांनी २५ नोव्हेंबर या दिवशी शासनाला दिली होती. त्याचप्रमाणे ‘ओल्ड गोवा अ‍ॅक्शन कमिटी’ या फलकाखाली अनेक लोक या वादग्रस्त बांधकामाच्या विरोधात गेले अनेक दिवस आंदोलन छेडत आहेत.

या पार्श्‍वभूमीवर उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर २५ नोव्हेंबर या दिवशी मडगाव येथे एका शासकीय कार्यक्रमाच्या वेळी पत्रकारांना म्हणाले, ‘‘जुने गोवे वारसास्थळाजवळील प्रकल्पाला मी शहर आणि नगरनियोजन मंत्री झाल्यावर अनुमती दिलेली नाही, तर पूर्वीच्या शहर आणि नगरनियोजन मंत्र्यांनी ही अनुमती दिली आहे; मात्र या प्रकल्पाला अनुमती देण्याच्या प्रकरणाचे अन्वेषण करून ही अनुमती मागे घेण्याचे आदेश शासकीय अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.’’

बांधकाम प्रकल्पाची अनुमती लेखी स्वरूपात मागे घेण्याची वाट पहाणार ! – ‘ओल्ड गोवा अ‍ॅक्शन कमिटी’

उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी संबंधित बांधकामाला दिलेली अनुमती मागे घेणार असल्याचे आश्‍वासन २ मासांपूर्वी वैयक्तिक भेटीच्या वेळी आम्हाला दिले होते. यासाठी आम्ही बांधकाम प्रकल्पाची अनुमती लेखी स्वरूपात मागे घेण्याची वाट पहाणार आहोत, असे मत ‘ओल्ड गोवा अ‍ॅक्शन कमिटी’ने व्यक्त केले आहे.

‘ओल्ड गोवा अ‍ॅक्शन कमिटी’चे सदस्य आंदोलनाचा एक भाग म्हणून सध्या जुने गोवे येथे ‘सत्याग्रह’ (भूक हरताळ) आंदोलन करत आहेत. ‘सत्याग्रह’ आंदोलनाला काँग्रेसचे कुंभारजुवे मतदारसंघाचे नेते समीर वळवईकर, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा आणि आपचे नेते राहुल म्हांबरे यांनी २६ नोव्हेंबर या दिवशी आंदोलनात सहभाग घेऊन पाठिंबा दर्शवला.

जुने गोवे येथील प्रकल्प बांधकामाला अनुमती देण्याच्या प्रक्रियेत ‘गोवा फॉरवर्ड’ पक्षाचा सहभाग नाही ! माजी शहर आणि नगरनियोजन मंत्री तथा ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई

जुने गोवे येथील प्रकल्प बांधकामाला अनुमती देण्याच्या प्रक्रियेत ‘गोवा फॉरवर्ड’ पक्षाचा सहभाग नाही, असे मत माजी शहर आणि नगरनियोजन मंत्री तथा ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले आहे. आमदार विजय सरदेसाई पुढे म्हणाले, ‘‘संबंधित प्रकल्पाला भाजपचे दिवंगत नेते फ्रान्सिस डिसोझा हे शहर आणि नगरनियोजन मंत्री असतांना अनुमती देण्यात आली होती आणि प्रकल्पाचे बांधकाम मे २०२१ मध्ये विद्यमान उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर हे शहर आणि नगरनियोजन मंत्री असतांना चालू झाले आहे.’’