‘सनबर्न’ला अनुमती नाही ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

केवळ कोरोनाकाळातच नव्हे, तर संस्कृतीचे आणि सामाजिक शांततेचे भंजन करणार्‍या कार्यक्रमांना कायमचेच हद्दपार करावे, अशी संस्कृतीप्रेमींची अपेक्षा आहे !

पणजी, २४ नोव्हेंबर (वार्ता.) – या वेळी सनबर्न महोत्सवाला अनुमती देण्यात येणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. ते म्हणाले, ‘‘या वेळी आम्ही सनबर्न महोत्सव रहित केला आहे. सनबर्न महोत्सवाविषयी माझ्याकडे आलेली धारिका परत पाठवण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात सनबर्न महोत्सवाच्या आयोजकांनी ‘हा महोत्सव २८ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत वागातोर येथे होईल’, असे घोषित केले होते. ‘या महोत्सवासाठी कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन मात्रा घेतलेल्या असतील, तरच प्रवेश देण्यात येईल’, असे म्हटले होते.

सनबर्न रहित करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविषयी कल्पना नाही ! – पर्यटनमंत्री मनोहर आजगांवकर

सनर्बन महोत्सव रहित करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविषयी मला कल्पना नाही, असे विधान पर्यटनमंत्री मनोहर आजगांवकर यांनी केले आहे. ते म्हणाले, ‘‘मला हे प्रसारमाध्यमांकडून कळले आहे. या कार्यक्रमाला अनुमती देण्याविषयी निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे धारिका पाठवण्यात आली होती. त्यांनी या विषयीच्या सर्व माहितीचा अभ्यास करून कार्यक्रमाला अनुमती न देण्याचा निर्णय घेतला असावा. ‘हा महोत्सव घेण्यात यावा’, असे माझे मत असले, तरी त्यासाठी लाखो लोक गोव्यात येतील. जर ‘गोव्यात जानेवारी किंवा फेब्रुवारी २०२२ पर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झाले, तर हा कार्यक्रम घेण्याविषयी विचार करावा’, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना करीन.’’